Huljanti Yatra: देशातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले गुरु बिरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनोखा सोहळा आज (मंगळवारी 25 ऑक्टोबर) मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून, तामिळनाडू आणि गोवा या राज्यातून लाखोंच्या संख्येने धनगर बांधव या अनोख्या भेटीसाठी हुलजंती येथे आले होते. या गुरुशिष्यांच्या भेटी दरम्यान हजारो टन भंडारा, खारीक खोबरे आणि लोकराची उधळण झाल्याने अवघा परिसर भंडाऱ्याने नाहून निघाला होता. बाराव्या शतकापासून चालत आलेली ही परंपरा असून दिवाळीच्या पाडव्या  दिवशी दुपारी चारच्या दरम्यान हा अनोख्या भेटीचा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लाखोंच्या संख्येने धनगर समाज वर्षभर वाट पाहत असतो. 


हुलजंती आणि हुन्नूर हा धनगर समाजाच्या आराध्य दैवतांचा विकास करणार असून याठिकाणी भाविकांच्या निवासासह इतर सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार समाधान अवताडे यांनी सांगितले. बिरोबा व महालिंगराया, या गुरू-शिष्यांच्या पालखीचा मुख्य भेटीचा सोहळा आज दुपारी चार  वाजता सूर्यग्रहणापूर्वी संपन्न झाला. अमावास्येला मुंडास बांधले गेले. मध्यान रात्री कैलासमधून शंकर पार्वती येतात अन् महालिंगराया मंदिराच्या पंच शिखराला (मुंडास) आहेर करतात आणि  यावेळी देवाची मूक भाकणूक झाली असेही मान्यता भाविकांच्या आहे. 


त्यानंतर गुरु-शिष्यांच्या पालखी भेटीचा सोहळा देवस्थानच्या बाजूने वाहत असलेल्या दूध ओढयात हजारोंच्या उपस्थितीत पार पडला. गुरुशिष्यांची पालखी भेट झाल्यानंतर नगारा व ढोल कैताळ वाजवीत इतर पालख्यानी महालिंगराया पालखीची भेट घेतली. यावेळी महालिंगराया- बिरोबाच्या नावान चांगभलंच्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात आले. नगारा व ढोल यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. हुलजंतीला हालमत धर्माची काशी मानली  जाते. नुकतीच पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरुदेवाची यात्रा पार पडली आहे. परंपरेनुसार त्यानंतर हा भेटीचा सोहळा लगेचच पार पाडत आहे.


दरम्यान, कोरोना संकटामुळे सव्वातीनशे वर्षांची परपंरा असलेल्या हुलजंती येथील ले गुरु बिरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनोखा सोहळा रद्द करण्यात आला होता.  हुलजंतीचे महालिंगरायांचे गुरू असून सतराव्या शतकापासून दरवर्षी अश्विन वद्य सप्तमीला हुलजंती येथून हजारो भाविक महालिंगरायाची पालखी घेऊन हुन्नूरमध्ये गुरू बिरोबाच्या भेटीसाठी येत असतात. मात्र यंदा हा सोहळा अगदी उत्साहात पार पडला. 


इतर महत्वाची बातमी: 


ठाकरे-शिंदे गटातील वादाचा कामगारांना फटका! नाशिक म्युनिसिपल कामगार कर्मचारी संघटनेचे कार्यालय बंद; प्रकरण पोलीस ठाण्यात