पंढरपूर: सध्या दुष्काळाची स्थिती गंभीर बनत चालली असून उजनी धरणाची पाणीपातळी  वजा पन्नास टक्के एवढी खालावल्याने उजनीच्या उदरात जलसमाधी मिळालेल्या अनेक पुरातन वास्तू आणि पुरातन मंदिरे (Old Temples) उघडी होऊ लागली आहेत . या जुन्या पुरातन वास्तू पाहण्यासाठी आता पर्यटकांची पावले उजनी धरणाकडे वळू लागली आहेत. उजनी धरणाचे बांधकाम झाल्यावर 1975 साली परिसरातील अनेक मंदिरे आणि वास्तू उजनीच्या (Ujani Dam) उदरात गडप झाल्या होत्या . यंदा झपाट्याने उजनीचे पाणी पातळी खालावू लागल्याने या पुरातन वास्तू आणि मंदिरे पूर्णपणे बाहेर आली आहेत . 


पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर भीमानदीच्या पात्रात 1975 साली जलसमाधी मिळालेले अतिप्राचीन हेमाडपंथी पळसनाथाचे मंदिर देखील पूर्णपणे उघडे पडले आहे . उजनी धरणातील पाण्यात गेले 40 वर्षे हे मंदिर  पाण्यात लाटांशी झुज देत तग धरून उभे आहे . इतकी वर्षे पाण्यात राहिल्याने सध्या काही प्रमाणात त्याची पडझड सुरु झाली असली तरी आजही पळसनाथ दिमाखाने उभे असल्याचे दिसून येते . 


उजनी धरणातील शेकडो वर्षापूर्वीचे हे पुरातन पळसनाथाचे हेमाड पंथी मंदिर पुन्हा झाले उघडे झाले असून  पाणी पातळी खालावू लागल्याने उजनीच्या पोटात अदृश्य झालेले पुरातन वैभव पुन्हा समोर येऊ लागले आहे. या पुरातन मंदिराची विहंगम ड्रोन दृश्यात याचे वैभव समोर येत आहे. 


हेमाडपंथी वास्तुकलेचा उत्तम नमुना


भीमा नदी किनाऱ्यावर  वसलेल्या या सुंदर व अतिप्राचीन वास्तूकलेचा नमुना म्हणून शेकडो  वर्षाच्या पळसनाथाच्या हेमाड पंथी मंदिराचा इतिहास खऱ्या अर्थाने 2002 साली उलगडला.  पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील पुरातत्व संग्रहालय आणि  येथील अभ्यासकांच्या मते हे मंदिर शके 1079 अर्थात  इ.स. सन 1157 मध्ये बांधले असावे. या मंदिराचा काळ  जरी निश्चित नसला तरी याचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात "पलाशतीर्थ" म्हणून आढळून येते .  हेमाडपंथी पळसनाथाचे मंदिराचे संपूर्ण कोरीव काम दगडात केले असून शिखराची सप्तभूमी पद्धतीची बांधणी आहे.  शिखरासाठी पक्क्या विटा चुना इ.वापर करून बांधले आहे. मंदिरा समोर भव्य सभा मंडप गाभारा उंच  शिखर लाब लाब शिळा विविध  मदनिका ,अलासकन्या , सूरसुंदरी,जलमोहिनी, नागकन्या अशी शिल्प  आहेत ज्यामुळे  भक्त  मंदिरात प्रवेश करत्या वेळी त्याच्या  मनातील वाईट भावना मंदिरा बाहेरच सोडून निर्मळ मनाने मंदिरात प्रवेश करावा याच उद्देशाने महिलारूपी शिल्पे मंदिराच्या शिखरावर कोरलेली असल्याचे इतिहासकार सांगतात .  उंच  मुर्त्या ,चौकोनी खांब ,वर्तुलाकृती  पात्रे त्यातच पुष्प, नट, स्तंभ, लवा,बेल,आशा पंच शाखा सुस्थितीत दिसून येतात अशा शिल्प मुर्त्या मध्ये प्रामुख्याने दशावतार ,शंकर पार्वती, तीन विरगळी तसेच रामायण, महाभारत आणि  इंद्र दरबारी असणाऱ्या देवी देवतांच्या शिल्प कला दिसून येतात.त्या काळी  आतिशय चाणक्य बुध्दिमत्तेचा वापर करून अफलातून अप्रतिम कोरीव काम करून त्याची केलेली जडण घडण खरीच वाखाणण्याजोगी आहे.


या  हेमाड पंथी पळसनाथ मंदिराची रचना पूर्ण पणे फक्त २७ दगडी नक्षीदार खांबा  पासून  तयार केलीली दिसते, मंदिराच्या आवारात प्रामुख्याने वड,पिपळ,चिंच या तीन झाडांची खोडे फांद्यांसह आजही मोठ्या दिमाखात उभी आहेत, या मंदिराचा सभोवताली भव्य दगडी तट बंदीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली तरीही तिचे आस्तित्व आजही असल्याचे दिसून येते. सदर  मंदिर ४५ वर्षे पाण्यात लाटांशी झुज देत असताना आज देखील चांगल्या व भक्कम स्थितीत  उभे आहे .  


ह्या मंदिराचे भव्य मोठे शिखर असून याचे बांधकाम एखाद्या प्रशस्त खोली सारखे असून या शिखरात प्रवेश करण्यासाठी छोटेसे व्दार आहे. या शिखरात सूर्य प्रकाश सतत  खेळता राहावा म्हणून चारही बाजूनी मोठ  मोठाले  सौणे आहेत. हे पळंसनाथ मंदिर ज्या वेळी पाण्या खाली गेले त्या वेळी पळसदेवकरांनी  येथील शिवलीग व काही मुर्त्या नवीन गावात आणून त्याची प्रानप्रतिष्ठा केली आहे..ह्या  मदिराच्या आवारात गेले असता  गाभाराच्या समोरच  असलेला नंदी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो .


पुरातन अवशेषांचे जतन करण्याची मागणी


या मंदिराच्या काही अंतरावर एक दगडी मंदिर आहे तेही उघडे झाल्याचे दिसते. या मंदिराचा अभ्यास करण्यासाठी काही तज्ञ मंडळी सध्या येथे मुक्काम ठोकून असून ते मंदिराची माहिती संकलित करण्याचे काम करीत आहेत. याच पद्धतीने पळसनाथाच्या शेजारी असणारे दुसरे एक पुरातन मंदिर देखील उघडे पडले असून याचेही नक्षीकाम खूप पुरातन आहे .  या  मंदिराच्या बाह्यभिंतीवर विष्णूच्या विविध रूपातील मुर्त्या, सूरसुंदरी आणि रामायणातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. शिल्पांकने अप्रतिम आहेत. मात्र, गेली 45 वर्षे पाण्यात असल्याने या मंदिराची  पडझड झाली आहे. अनेक दुर्मिळ शिल्पे खाली पडलेली आहेत. काही शिल्पांचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे या पूरातन एतिहासिक साठा जतन करण्याची मागणी इतिहासप्रेमी करतायेत. या कलेच्या ऐश्वर्याचा ठेवा  दाखवणाऱ्या या मंदिराचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार घेवून स्थानिकांच्या माध्यमातून हा प्राचीन शिल्पकलेचा ठेवा जपण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी पुढे येत आहे.


आणखी वाचा


सोलापुरात भीषण पाणीटंचाई; उजनी धरण मायनस 37.09 टक्क्यांवर, 93 फूट विहिरीने तळ गाठला