Solapur : राज्यातील काही जिल्ह्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातही पाणीटंचाईने सीमा गाठलीये. उजनी धरण मायनस 37.09 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर एका 93 फूट विहिरीने तळ गाठलाय. विहिरींची पाणीपातळी खोलवर गेल्याचे मार्च महिन्यात दिसून आले होते. पाऊस कमी पडल्याने सोलापूरकरांना भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मागील पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे पाणी पातळीने तळ गाठलाय.
राज्य शासनाने 5 तालुके व 55 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत मार्च महिना संपत येत असून जिल्ह्यात टंचाईची तीव्रता वाढत जाणार आहे. प्रत्येक गावात नागरिकांना पिण्यासाठी पाणी तसेच जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. शिवाय उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपस्थित होते. तर सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ऑनलाईन प्रणालीद्वारे जॉईन झालेले होते.
आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा करा
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, टंचाईच्या उपाययोजना राबवत असताना ग्रामीण व शहरी भागात टँकर सुरू करण्याची मागणी आल्यावर त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्य अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. त्या ठिकाणी त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल याबाबत काळजी घ्यावी. पाण्यासाठी टँकर किती सुरू करावेत याबाबत कोणतीही अडचण नाही, परंतु टँकरची मागणी आल्यानंतर त्या ठिकाणी टँकरची किती प्रमाणात आवश्यकता आहे, याची खात्री करूनच ते सुरू करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
टंचाईच्या उपाययोजना राबवून सर्वसामन्यांना दिलासा द्या
सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी टंचाईच्या उपाययोजना राबवत असताना यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कोणतीही अडचण नाही ही बाब लक्षात घेऊन टंचाई उपाययोजना अत्यंत परिणामकारकपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. त्याप्रमाणेच उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनासाठी पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर नदी काठावरून पाण्याचा उपसा होणार नाही यासाठी वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे का? याची खात्री करावी. वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत समन्वय ठेवून पाणी उपसा होणार नाही यासाठी पथके नियुक्त करावीत, असेही त्यांनी निर्देशित केले.
इतर महत्वाच्या बातम्या