पंढरपूर: सोलापूरच्या उजनी धरणातून सुरु असणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने पंढरपूरकरांना (Pandharpur) दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उजनी धरणातील पाण्याच्या विसर्गाचा वेग एक लाख 16 हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. सोमवारी दिवसभरात उजनी धरणातून (Ujani Dam) भीमा नदीपात्रात तब्बल सव्वालाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे चंद्रभागा नदीचे (Chandrabhaga River) पात्र फुगून पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता उजनी धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. वीर धरणातील पाण्याची आवक मंदावल्याने वीर धरणातूनही आता कमी पाणी सोडले जात आहे . त्यामुळे आता बुधवारपर्यंत पंढरपूरमधील पूरजन्य स्थिती उद्यापर्यंत कमी होऊ शकेल.
मंगळवारी सकाळी सहा वाजता उजनी धरण 107 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असून धरणात 121 टीएमसी एवढे पाणी जमा झाले आहे . सध्या उजनी धरणाकडे एक लाख 16 हजार विसर्गाने पाणी येत असून धरणातून भीमा नदीत सव्वा लाख क्युसेक वेगाने पाणी सोडणे सुरू आहे. पुणे परिसरातील पाऊस थांबल्याने उजनीकडे येणारा विसर्ग कमी होऊ लागला आहे. आज दिवसभरात पाऊस जोर कमी राहिल्यास पंढरपूरचा धोका कमी होणार आहे. याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरल्याने वीर धरणाकडे येणारा पाण्याचा विसर्ग कमी होत आहे. वीर धरणाचा विसर्ग 23 हजारावरून 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील मोठा पाऊस आणि उजनी, वीर धरणांमधील मोठ्या विसर्गामुळे येथील भीमा उर्फ चंद्रभागेला पंढरपूरमध्ये पाऊस न पडताच सोमवारी मोठा पूर आला होता. या पुराने चंद्रभागा नदीने धोका पातळी ओलांडत पंढरपूरमधील नदी काठालगतची 20 गावे तसेच शहरालगत पूर स्थिती निर्माण केली आहे. वाळवंटातील सर्व मंदिरे, घाट पाण्याखाली गेले आहेत. शहरातील नदीकाठच्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते.
पंढरपूरकरांना 2006 च्या पुराची आठवण
पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावस पुन्हा सुरु झाल्यास उजनी व वीर धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही प्रशासनाने सोमवारी केले होते. यापूर्वी 2006 साली उजनी धरणातून तब्बल सव्वा तीन लाख तर वीर धरणातून 1 लाख क्युसेक निसर्गाने पाणी सोडल्यानंतर पंढरपुरात सर्वात मोठा महापूर आला होता. त्यावेळी विठ्ठल मंदिराजवळ असणाऱ्या चौफाळा येथेही पाणी आले होते. यंदाही परिस्थिती तशीच असून ऑगस्टच्या सुरुवातीलाच सर्व धरणे भरली असून अद्यापही पावसाचे दोन महिने बाकी असल्याने पंढरपूरसह परिसरावर महापुराची टांगती तलवार कायम आहे.
आणखी वाचा
उजनीची शंभरीकडे वाटचाल, बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद, मागील वर्षीची सर्वोच्च पातळी ओलांडली