सोलापूर : गतवर्षी पाऊसकाळ नसल्याने उजनी धरणातील (Ujani dam) पाणीपातळीवरुन काळजी करण्यात येत होता. मात्र, उजनी धरण आत्ताच ओव्हर फ्लो झाल्याने यंदा पंढरपूर शहरावर महापुराची टांगती तलावर असून आज रात्री चंद्रभागेच्या पात्रातून इशारा पातळीपर्यंत पाणी वाहणार असल्याने आमदार समाधान अवताडे यांनी प्रशासनाची तातडीची बैठक घेत सूचना दिल्या आहेत. उजनी धरण व वीर पाणलोट क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामुळे (Rain) धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून उजनी धरणात आता 102 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अजूनही धरणात 2 लाख 5 हजार क्युसेक विसर्गाने पाणी जमा होत असल्याने पूरनियंत्रणासाठी तारेवरची कसरत केली जात आहे. आज सायंकाळी  धरणातून पाण्याचा विसर्ग 1 लाख 25 हजार  तर वीरधरणातून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, पंढरपूर (Pandharpur) परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  


पंढरपूरातील संगम येथून दुपारी 3 वाजेपर्यंत 1 लाख 37 हजार 860 क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदीच्या पाणी पातळीत  वाढ झाली आहे. निरा नरसिंहपूर येथील संगमाजवळ असणारा विसर्ग 1 लाख 60 हजार क्युसेकपर्यंत वाढणार असल्याने भीमा नदी पात्रातील वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन आमदार समाधान अवताडे यांनी केले आहे. 


1 लाख 37 हजार क्युसेकने पाणी वाहणार


पंढरपूर येथे आमदार अवताडे यांनी प्रशासनाची तातडीची बैठक घेऊन पूरस्थितीबाबत सूचना दिल्या आहेत. ज्या कुटुंबांचे स्थलांतर केले आहे, त्यांना सर्व सोयीसुविधा पुरविण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. आज दिवसभर पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने उजनी आणि वीर धरणात येणारी पाण्याची आवक उद्या मंदावणार असल्याने उद्या या दोन्ही धरणातील विसर्ग थोडा कमी करण्याची शक्यता आहे. मात्र, अजूनही पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला असल्याने प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना आमदार अवताडे यांनी दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सध्या चंद्रभागा नदी पात्रात सध्या 59 हजार 222 क्युसेक पाणी वहात आहे. संगम येथून येणाऱ्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी पात्रात रात्री 8 वाजेनंतर सुमारे 1 लाख 37 हजार क्युसेकने पाणी वाहणार आहे.  


भीमा नदीत विसर्ग वाढल्यानंतर येतो पूर


भीमा नदीवरील पंढरपूर तालूक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरुन होणारी वाहतूक बंद राहणार आहे. चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या  गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात कोणीही उतरु नये, असे आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी, पोलीस पाटील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. भीमा  नदीपात्रात 1 लाख 30 हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर  ( 443.600 पाणी पातळी मीटर) नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. हा विसर्ग 1 लाख 60 हजार  क्युसेक झाल्यावर  (444.500 पाणी पातळी मीटर) गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. तर 2 लाख क्युसेक विसर्ग आल्यावर  (445.500 पाणी पातळी मीटर) शहरातील  संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते. 2 लाख 25  हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर  ( 446.300 पाणी पातळी मीटर) गोविंदपुरा येथे पाणी येते. विसर्ग 3 लाख क्युसेक आल्यावर (447.850 पाणी पातळी मीटर) कबीर मठ पायथा, जुनी नगरपालिका इमारत या ठिकाणी सुमारे एक  ते दीड  फुट पाणी येते. विसर्ग 3 लाख 25  हजार  क्युसेक आल्यावर (448.200 पाणी पातळी मीटर) दत्तघाट, माहेश्वरी धर्मशाळा, महाव्दार घाट, कालिका मंदिर चौक या भागात सुमारे एक फुट पाणी येण्यास सुरुवात होते. 


पंढरपूरकरांना 2006 च्या पुराची आठवण


पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावस पुन्हा सुरु झाल्यास उजनी व वीर धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता   असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. यापूर्वी 2006 साली उजनी धरणातून तब्बल सव्वा तीन लाख तर वीर धरणातून 1 लाख क्युसेक निसर्गाने पाणी सोडल्यानंतर पंढरपुरात सर्वात मोठा महापूर आला होता. त्यावेळी विठ्ठल मंदिराजवळ असणाऱ्या चौफाळा येथेही पाणी आले होते. यंदाही परिस्थिती तशीच असून ऑगस्टच्या सुरुवातीलाच सर्व धरणे भरली असून अद्यापही पावसाचे दोन महिने जायचे असल्याने पंढरपूरसह परिसरावर महापुराची टांगती तलवार  कायम आहे.