Solapur : सांगोला तालुक्यातील जवळा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. अचानक आलेल्या वावटळीत पालासकट (तंबू)  झोळी उंच उडून पडली आणि झोळीत झोपलेल्या दीड वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला. झोळी 40 फूट उंच उडून खाली पडल्याने चिमुरडीच्या डोक्याला भीषण मार लागला आणि यातच तिचा जागीच मृत्यू झाला.


जवळा परिसरातील लेंडी नाला येथे मरीआई समाजाची काही कुटुंबे पाले (तंबू) टाकून राहत आहेत. मूळच्या भटक्या जमातीतील या समाजाची विंचवाच्या पाठीवर बिऱ्हाड अशी अवस्था असते. जगण्यासाठी हा समाज अगदी भंगार गोळा करण्यापासून ते मिळेल ती कामे करून आपला उदरनिर्वाह चालवत असतो.


गुरूवारी दुपारी अडीचच्या सुमारास येथील परिसरात वावटळ सुरु झाली आणि ती एका पालात (तंबूत) शिरली . काही कळायच्या आत हे पाल (तंबू) झाडाच्या पानासारखे उडून गेले आणि 40 फुटापेक्षा अधिक उंचीवरून खाली पडले, यातच कस्तुरा साधू चव्हाण  या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला.


दुर्दैव म्हणजे ही घटना घडत असताना तिचे आई-वडील दवाखान्यात होते आणि केवळ आजी-आजोबांसोबत ती या पालात (तंबूत) होती. कस्तुरीच्या आईचे काल दुपारी कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन होते, म्हणून ती समोरच असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. तिची रक्त तपासणी करून ऑपरेशन पूर्वीचे इंजेक्शन दिले होते आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली.


वावटळीत दगडावर आपटल्यावर दीड वर्षाच्या कस्तुरीला तातडीने त्याच दवाखान्यात आणले गेले, मात्र डॉक्टरांनी तिचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगताच तिच्या आईने ऑपरेशन थांबवून आपल्या लेकीवर अंत्यसंस्कार केले. मृत कस्तुरी ही सोनंद येथून वडील (साधू अण्णा चव्हाण) आणि आईसह आजोबा (रमेश भीमा निंबाळकर) यांच्याकडे आली होती.


हा प्रकार घडताना धुळीचे लोट उडाल्याने नेमके काय घडते आहे हे समजायच्या आत पाल (तंबू) वावटळीत उडून गेले. गोंधळामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी झोळीत झोपलेली कस्तुरी खाली पडून तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनाम्यासाठी बोलावले. याशिवाय जवळा ग्रामस्थांच्या वतीने चव्हाण कुटुंबीयांना आर्थिक मदतही देऊ केली. तर, शासनाकडून या कुटुंबाला तातडीने मदत दिली जाईल, अशी माहिती यावेळी दीपक साळुंखे यांनी दिली.


संबंधित बातमी:


Pune Weather Update : दोन दिवस पावसाचे, पुण्यात पावसाला सुरुवात; ऑरेंज अलर्ट जारी