Pune Weather Update : पुणे शहर आणि जिल्ह्यात (Pune Weather) गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. दिवसभर आकाश ढगाळ राहिल. त्यानंतर संध्याकाळी सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. तापमानामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. या पावसामुळे पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे.


पुण्यातील कात्रज, हडपसर आणि स्वारगेट परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातून कमी दाबाचा पट्टा जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता आणि दिवसा तापमानात वाढ झाल्याने वातावरण अस्थिर झाले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून कमाल तापमानात घट झाल्याने पुणेकर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात कमाल तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. मात्र दोन दिवस तापमान 40 अंशांच्या खाली गेले. पुणे जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा अपेक्षित आहे.


17 जिल्ह्यात पावसाची शक्यता...


पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या 17 जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


पुण्यातील विविध भागात पावसाला सुरुवात


शहरातील कोथरुड परिसर, हडपसर, मांजरी परिसरात आज सकाळीच पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळीच अचानक पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तसेच ऑफिसला निघालेल्या नागरिकांची धांदल उडाली आहे. याशिवाय वाघोली परिसरात देखील जोरदार पाऊस सुरु झाला आहे.


शेतकरी चिंतेत


मागील काही दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेकऱ्याचे हाताशी आलेले पीक आडवे झाले आहे. सोबतच राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. एकीकडे ऊन आणि दुसरीकडे पाऊस असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत आहेत. त्यासोबतच काही प्रमाणात अवकाळी पाऊसदेखील पडत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.


हेही पाहा


बळीराजा खचला, अवकाळीमुळे लिंबूच्या बागा उद्ध्वस्त, वाशिममध्ये झाडे उन्मळून पडली