सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस; नगर प्रदक्षिणेसह तैलाभिषेक सोहळा
Siddheshwar Maharaj Yatra, Solapur: श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. आज यन्नीमज्जन, तैलाभिषेक सोहळा पार पडणार आहे.
Siddheshwar Maharaj Yatra, Solapur: सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा (Siddheshwar Maharaj Yatra) आज मुख्य दिवस असून आज नगर प्रदक्षिणेसह तैलाभिषेक सोहळा पार पडणार आहे. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जवळपास 900 वर्षांची परंपरा आहे. यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक घेत असतात. श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही सोलापूरमध्ये गड्डा यात्रा म्हणून ओळखली जाते
यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात. मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे हा अभूतपूर्व सोहळा अनेक भाविकांना याची देही याची डोळा पाहता आला नाही. कोरोनाचे सावट कमी झाल्याने आणि राज्य शासनाने निर्बंध कमी केल्याने यंदा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यात्रेतील मुख्य धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होणार आहे.
श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. आज यन्नीमज्जन, तैलाभिशेक सोहळा पार पडणार आहे. सकाळी 8 नाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होते. पूजा झाल्यानंतर नगरप्रदिक्षणेस सुरुवात होते. यावेळी श्री सिध्देश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ सरकारतर्फे आहेर केला जातो. हा मान ब्रिटीश काळापासून आजतागायत चालू आहे. तेथून हे नंदीध्वज सिध्देश्वर मंदिरात 68 लिंगापैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ येऊन थांबतात. त्याठिकाणी सातही नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू आणि शेटे तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधीवत पूजा करतात. पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांचा गदगीस तैलाभिषेक घालून विधीवत पूजा केली जाते. पुढे हे नंदीध्वज सोलापुरातील सर्व 68 लिंगास प्रदक्षिणा घालून रात्री हिरेहब्बूंच्या वाड्यात परत येतात.
दरवर्षी प्रथेप्रमाणे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा पार पडत असतो. दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत असते. त्यामुळे 13 जानेवारीला सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा पार पडत असतो. यंदाच्या वर्षी अधिक महिना आल्यानं मकर संक्रांत ही एक दिवस उशिरा अर्थात 15 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा हा 13 जानेवारी ऐवजी 14 जानेवारी रोजी साजरा होणार आहे. त्यापूर्वी यात्रेतील आणखी एक प्रमुख विधी असलेला यन्नीमज्जन सोहळा 13 जानेवारी रोजी पार पडणार आहे. यात्रेतील धार्मिक विधी मात्र उद्या 11 जानेवारी पासून सुरु होणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Gadda Yatra Soapur : गड्डा यात्रेसाठी सोलापूर सज्ज...पाहा फोटो