पंढरपूर : राज्याच्या नव्या आरोग्यमंत्र्यांनी (Health Minister) जाहीर केल्याप्रमाणे शासकीय रुग्णालयांना सरप्राईज भेटीच्या कार्यक्रमात मंत्र्यांनी प्रशासनाची अनेक ठिकाणी पोलखोल केल्याने प्रशासन गडबडून गेले. आज आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी नातेपुते आणि माळशिरस येथील शासकीय रुग्णालयांना अचानक भेटी देत रुग्णांच्या स्वच्छतागृहांपासून ऑपरेशन थिएटरपर्यंत सर्वांची तपासणी केल्याने डॉक्टर गडबडून गेले. हॉस्पिटलच्या मेडिकल शॉपमध्ये कोणत्या गोळ्या आहेत याची माहिती घेत त्यांनी गोळ्या औषधांची तपासणी केली.
आरोग्यमंत्र्यांकडून स्वच्छतागृहाची पाहणी
यावेळी कोविड लसीकरणाची माहिती घेताना दोन डोसमधील संख्येत मोठी तफावत दिसल्याने त्याचा जाब विचारला आणि माहिती देणारे डॉक्टर गडबडले. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये नऊ महिन्याचे अंतर असल्याचे एका जबाबदार डॉक्टरांनी सांगताच आरोग्यमंत्री भडकले आणि त्यांनी त्यांना ते अंतर 84 दिवसाचे असल्याचे सांगितले. तुम्ही मला चुकीची माहिती देण्यापेक्षा लसीकरण कार्यक्रम व्यवस्थित राबवा असा सल्ला दिला. पाहणी करताना आरोग्यमंत्र्यांनी थेट रुग्णांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाची पाहणी करून व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली.
हॉस्पिटलमध्ये असणारे फायर फायटर मशीन चांगले आहे असे कर्मचारी सांगू लागताच ते उघडून वापरून दाखवण्यास सांगितले. रुग्णालयात अॅडमिट असणाऱ्या रुग्णांशी संवाद साधत कोण उपचार करते आहे? औषधे मिळतात का? अशा चौकशा केल्या. यावेळी बेडवर असणाऱ्या खराब बेडशीटवरूनही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यातील सर्व लहान मोठ्या शासकीय रुग्णालयांची पुढील 15 दिवसात वरिष्ठ अधिकारी तपासणी करून अहवाल देतील . यानंतर रुग्णांचे आरोग्य विभागाबाबत असणारे अनुभव आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा यावर पुढील तीन महिन्यात राज्यातील आरोग्यव्यवस्थेचा रोड मॅप बनविणार असल्याचे डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
अनेक वक्तव्यांमुळे व्हायरल
शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यापासून तानाजी सावंत हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले आहेत. कोण ते आदित्य ठाकरे? असं त्यांनी विधान केलं होतं. यावरुन चर्चेत राहिले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात पालघरच्या आरोग्य यंत्रणेबद्दल विरोधकांकडून त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावरुन देखील ते सोशल मीडियावर चर्चेत होते. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. पावसाळी अधिवेशनात अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नसल्याने पहिल्याच दिवशी त्यांची दमछाक झाली होती.
संबंधित बातम्या :