उस्मानाबाद : राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे तीनतेरा वाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात रात्री एका महिलेची चक्क स्वच्छतागृहात प्रसुती (Delivery in Toilet) झाली. प्रसुतीनंतर तब्बल एक तास तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. बेड मिळाला नाही. प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यावर ही महिला स्वच्छतागृहात गेली. तिथेच तिची प्रसुती झाली, असा त्या महिलेचा आणि तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे.


 बार्शी (Barshi) तालुक्यातील नारीवाडी सासर आणि तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) माहेर असलेली रूक्मिणी सुदर्शन सुतार या 19 वर्षीय महिलेस प्रसुतीसाठी उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात (District Women Hospital Osmanabad)  दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्वच्छतागृहाकडे गेली असता तिथेच तिची प्रसुती झाली. डॅाक्टर आणि नर्सिंग स्टाफने या प्रकरणी वेगळी माहिती दिली आहे. तिच्याकडे सुरूवातीपासून लक्ष दिले होते. ती डॅाक्टरांच्या सूचनेकडे लक्ष देत नव्हती असा त्यांचा दावा आहे


एबीपी माझाची टिमने या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील या सर्वात मोठ्या रूग्णालयात पोहचली तेव्हा अतिशय भयंकर परिस्थिती उघड झाली आहे. प्रत्यक्षात या रूग्णालयाची अवस्था अतिशय भीषण आहे. 60 बेडची मान्यता असलेल्या या रूग्णालयात रोज 175 पर्यंत प्रसुती होत आहेत. रूग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या पेशंटसाठी बेड शिल्लक नाहीत. बेड आहेत तिथे गाद्या नाहीत. अनेक पदे रिक्त आहेत. कालही दिवसभरात 21 प्रसुती झाल्या. रात्री 11 प्रसुती झाल्या. तेव्हा वार्डात केवळ दोन नर्स आणि एक डॅाक्टर उपस्थित होते. अपुर्‍या सोयीसुविधा आणि अपुरा अधिकारी, कर्मचारी वर्ग देखील अशा असुविधांना कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. 


या प्रकारामुळे जिल्ह्यातील ढेपाळलेल्या आरोग्य यंत्रणेचा आणखी एक नमुना समोर आला आहे.  उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे डॉ.तानाजी सावंत यांच्यावर राज्याच्या आरोग्य मंत्री पदाची धुरा असताना त्यांच्याच जिल्ह्यात असा प्रकार घडला आहे. त्यामुळे बेलगाम आरोग्य यंत्रणेला शिस्त लावण्याचे मोठे आव्हान आरोग्यमंत्र्यांसमोर आहे.   अपुर्‍या सोयीसुविधा आणि अपुरा अधिकारी, कर्मचारी वर्ग देखील अशा असुविधांना कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत असले तरी उपलब्ध कर्मचार्‍यांची बेफिकिरी एखाद्याच्या जीवावर बेतली तर जबाबदार कोण? याचे उत्तर देण्यास कोणी तयार नाही.