Tanaji Sawant In Pune:  राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे 26, 27 आणि 28 ऑगस्टला पुण्यात होते. त्यामुळे जिल्हा माहिती कार्यालयाकडून त्यांच्या पुणे दौऱ्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यामध्ये मंत्री महोदय हे तीन दिवस फक्त कात्रज भागातील त्यांच घर आणि कात्रज भागातच असलेलं त्यांच्या संस्थेच कार्यालय या दरम्यान ये-जा करणार असल्याच सांगण्यात आलं. तीन दिवसांमधे मंत्री नऊ वेळा घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर एवढाच प्रवास करणार होते. तानाजी सावंत यांच्या या दौऱ्याची माध्यमांतून चांगलीच चर्चा सुरु झाली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या तानाजी सावंतानी 27 तारखाला त्यांचा मोर्चा पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयाकडे वळवला. 


ससून रुग्णालयात गरीब रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याची तक्रार आपल्याला प्राप्त झाल्याचं म्हणत त्यांनी ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर विनायक काळे यांच्या केबिनमधे प्रवेश केला. मंत्रीमहोदय आले म्हटल्यावर सगळ्यांची पळापळ झाली.  तानाजी सावंतानी ज्या रुग्णाने आणि रुगाणाच्या नातेवाईकाने उपचार मिळत नसल्याची तक्रार केली होती त्यांना डीन च्या केबिनमधे बोलावून घेतले आणि डीन डॉक्टर विनायक काळे आणि ससुनच्या इतर डॉक्टरांना फैलावर घेतले. आरोग्यमंत्र्यांचा असा अवतार पाहून ससून मधील सगळा स्टाफ अवाक झाला. 


दुसरीकडे तानाजी सावंत यांचेच काही सहकारी ते ससुनच्या डॉक्टरांची खरडपट्टी काढत असल्याचा व्हिडीओ शुट करत होते. त्यानंतर तानाजी सावंत कसे कार्यक्षम आहेत आणि लोकांच्या मदतीला धावून जातात म्हणून तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. पण ससुनमधे रुग्णांना उपचार मिळत नसल्याचा साक्षात्कार तानाजी सावंताना अचानक कसा झाला, असा प्रश्न ससुनमधे विचारला जाऊ लागला.  ससून मधील कर्मचाऱ्यांकडून त्याबद्दल नाराजी देखील व्यक्त करण्यात आली. तानाजी सावंताना खरच ससूनचा कारभार सुधारायचा आहे, की आपल्यावर अजब दौर्‍यामुळे होत असलेल्या टिकेचा रोख दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला असा प्रश्न सगळ्यांना पडलाय कारण त्यानंतर ससून च्या कारभाराबाबत त्यांनी एकही बैठक घेतलेली नाही.


अनेक विधानांमुळे व्हायरल
शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यापासून तानाजी सावंत हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले आहेत.  कोण ते आदित्य ठाकरे? असं त्यांनी विधान केलं होतं. यावरुन चर्चेत राहिले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात पालघरच्या आरोग्य यंत्रणेबद्दल विरोधकांकडून त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावरुन देखील ते सोशल मीडियावर चर्चेत होते. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. पावसाळी अधिवेशनात अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नसल्याने पहिल्याच दिवशी त्यांची दमछाक झाली होती.