सोलापूर : मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोधा करणाऱ्या तरुणाला मराठा क्रांती मोर्चाने चोप दिला. प्रताप कांचन असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या अंगावर ऑईल ओतून त्याला उठाबश्या काढायला लावल्या. त्यानंतर त्याला माफी देखील मागायला सांगितली. प्रताप कांचन हा सुद्धा मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे. पण काही दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्याने कुणबी आणि मराठा वेगळे असल्याचा दावा केला होता. त्यामुळे मराठा क्रांती मार्चाने त्याला चोप दिला. दरम्यान दरम्यान मंत्री तानाजी सावंत यांच्या सांगण्यावरून प्रताप कांचन याने कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय.
सध्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जातेय. पण संपूर्ण मराठा समाज हे कुणबी प्रमाणपत्र स्विकारणार का हा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला जातोय. त्यातच मराठा समाजाचे आंदोलक प्रताप कांचन आणि सुनील लागणे यांनी मराठा आणि कुणबी वेगवेगळे असल्याचा दावा केला होता.
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी काय म्हटलं?
मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले. अनेक आंदोलनं करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून मनोज जरांगे यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली जातेय. पण प्रताप कांचन आणि सुनील लागणे हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत, पण ते मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी करतात. हे काय समाजाचे मालक आहेत का, असा सवाल मराठा क्रांती मार्चाच्या आंदोलकांनी उपस्थित केला. त्यामुळे प्रताप कांचन यांना माफी मागायला लावली असल्याचं यावेळी या आंदोलकांनी सांगितलं.
दरम्यान मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यातबाबत सरकारने देखील पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सोमवार (30 ऑक्टोबर) रोजी आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, शिंदे समितीने एक प्रथम अहवाल सादर केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारून पुढची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी (Kunbi Certificate) सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत