पंढरपूर : माढाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांनी काल मराठा समाजाची (Maratha) माफी मागितल्यानंतर आता त्यांच्या मुलाच्या व्हायरल व्हिडीओमुळे (Viral Video) ते पुन्हा अडचणीत आले आहे. जरांगे यांच्या सभेला खर्च केलेले 50 हजार रुपये व्याजासह मराठा महिलांनी गोळा करून परत पाठवायला सुरुवात केली आहे.
मराठा आंदोलनात माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे पहिल्यापासून वादात अडकत गेले होते . अजित पवार यांना नो एन्ट्री करण्याची भूमिका मराठा समाजाने घेऊनही अजित पवार या पिंपळनेर येथील मोळी टाकायच्या कार्यक्रमाला आले होते.यावेळी बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी चार नेत्यांनी मराठा समाजाचा ठेका घेतला आहे का असे वक्तव्य केले होते .यानंतर गावोगावी आमदार शिंदे यांच्याविरोधात मराठा समाजाने आंदोलने सुरु केल्यावर दोन दिवसापूर्वी आमदार शिंदे यांनी सोलापूर येथे जाऊन मराठा आंदोलनस्थळी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती.
फोनवरून पैसे पाठवण्यास सुरुवात
यानंतर त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी केलेल्या कथीत वक्तव्यावर वाद सुरु झाला असून त्याविरोधात मराठा समाज अधिक आक्रमक झाला आहे. पंढरपूर येथील जरंगे यांच्या सभेला 50 हजार रुपये आपण दिल्याचे कथित वक्तव्यावर हा नवा वाद सुरु झाल्यानंतर काल इसबावी येथे झालेल्या ठिय्या आंदोलनात शिंदे पितापुत्राचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित महिलांनी पदराची झोळी करून पैसे गोळा करून शिंदे पुत्राला देण्याची तयारी सुरु केली आहे. याच ठिकाणी उपस्थित आंदोलकांनी फोन पे वरून आमदार शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्या खात्यात फोनवरून पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे.
आमदार बबनदादा शिंदे यांच्या अडचणीत वाढ
आमच्या मराठा समाजाला अशा पैशाची मस्ती आलेल्या शिंदे कुटुंबाचा पैसे नको असून आता त्यांना व्याजासकट म्हणजे 55 हजार रुपये परत दिले जातील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आमदार शिंदे यांच्या कुटुंबाकडे कुणबी प्रमाणपत्र असून त्यांचा एक मुलगा ओबीसी जागेवर याच प्रमाणपत्रावर निवडून आला आहे.त्यामुळे स्वतः कुणबीचे दाखले मिळवून समाजाला दाखले मिळताना विरोध करायचे काम आमदार बबनदादा शिंदे करीत असल्याचा आरोप मराठा समन्वयक किरणराज घाडगे यांनी केला आहे .आता एकदा माफी मागितल्यानंतर पुन्हा मुलाच्या कथित वक्तव्यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत .
पैसे व्याजासकट परत देण्याची समाजाची भूमिका
आमदार शिंदे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर माढा विधानसभा मतदारसंघात सलग सहावेळा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे . मात्र जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आमदार बबनदादा शिंदे हे मराठा समाजासाठी व्हिलन ठरू लागल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत .पंढरपूर येथील जरंगे यांच्या सभेचा खर्च समाजाने केला असताना आमदार पुत्र कोते बोलत असले तरी समाज त्यांनी सांगितलेले पैसे व्याजासकट परत देईल अशी भूमिका मराठा समाजाने घेतल्याने पुन्हा शिंदे याना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे .