धुळे: राज्य सरकारची सध्याची अवस्था ही सकाळी ओरडणाऱ्या कोंबड्यासारखी झालीय, तो कोंबडा फक्त ओरडतोय, अंडं काही देत नाही अशी टीका मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation Protest) माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी केली आहे. राज्य सरकार हे फसवणुकीचं काम करत असून मनोज जरांगे यांनी सरकारला आता एक मिनीटही वेळ देऊ नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली. 


काय म्हणाले अनिल गोटे? 


धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आता एक मिनिट देखील वेळ देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात नॉन सिरिअस सरकार असल्याचं ते म्हणाले. सध्याच्या राज्य सरकारची अवस्था ही सकाळी ओरडणाऱ्या कोंबड्यासारखी झाली असल्याचे म्हणत कोंबडा फक्त ओरडतो, परंतु अंडं मात्र देत नाही, असं म्हणत मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर गोटे यांनी निशाणा साधला आहे.


देवेंद्र फडणवीसांवर टीका 


हे सरकार फक्त आणि फक्त घोषणा करणार सरकार असल्याचे म्हणत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार अशा घोषणा वारंवार या सरकारच्या मंत्र्यांकडून केल्या जात आहेत. यापूर्वी देखील मराठ्यांना आरक्षण या सरकारमधील मंत्र्यांनी दिले होते. परंतु मग सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकले का नाही, असा प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोटे यांनी निशाणा साधला आहे. 


सदावर्त्तेंची मराठा समाजसंदर्भातील सध्याची वक्तव्यं बघता त्यांचा बोलवता धनी हे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते पडळकर किंवा सदावर्ते यांनाच कुठल्याही प्रकारची वक्तव्यं करायला लावतात असा आरोपही त्यांनी केला. 


सोशल मीडियावर आंदोलनाची धग


मराठा आरक्षण याच विषयाभोवती मागच्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा आंतरवालीत आंदोलन सुरु केले आहे. परिणामी राज्यातल्या प्रत्येक गावात, शहरात आंदोलनं सुरू आहेत, तेही तीव्रतेने. मात्र एकीकडे हे प्रत्यक्ष आंदोलन सुरू असताना सोशल माध्यमांचाही या आंदोलनासाठी मोठा उपयोग केला जात आहे. प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवर मराठा आरक्षणाबाबत पोस्टचा अक्षरशः पाऊस पडतोय. प्रत्येक घटना मीडियामध्ये येण्याआधी सोशल मीडियावर येत आहे. 


आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यातील मूलभूत गरजच सोशल माध्यमं झाली आहेत. वैयक्तिक असो की सामाजिक गोष्ट, प्रत्येक अपडेट फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर,  यूट्यूब, स्नॅपचॅट आदी प्लॅटफॉर्मवर केली जात आहे. याच माध्यमांचा मराठा आरक्षणाबाबत जोरदार उपयोग केला जात आहे. 


ही बातमी वाचा: