Solapur: राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी, एकाच दिवसात तीन ठिकाणी कारवाई
Marathi News : सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरातील तीन ढाब्यांवर अचानक छापे टाकून ढाबाचालकांसह त्या ठिकाणी दारू पिताना आढळून आलेल्या 19 मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

Solapur Latest Marathi News Update: सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरातील तीन ढाब्यांवर अचानक छापे टाकून ढाबाचालकांसह त्या ठिकाणी दारू पिताना आढळून आलेल्या 19 मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या सर्व आरोपीविरोधात एकाच दिवसात न्यायालयात गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि न्यायाधीशांनी देखील एकाच दिवसात 19 मद्यपींसह सहा जणांना एक लाख 13 हजारांचा दंड ठोठावलाय.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापुरातील केगाव-देगाव रोडवरील हॉटेल जयभवानी फॅमिली गार्डन ढाब्यावर छापा टाकून ढाबाचालक बाबाराव हरिबा जाधव यांच्यासह नऊ मद्यपी ग्राहक असे एकूण दहाजणांना अटक केली होती. तसेच सोलापूर-पुणे महामार्गावरील दक्खनचा वाडा या ढाब्यावर छापा टाकून ढाबाचालक गणेश सुभाष मोरे आणि सहा मद्यपी ग्राहक अशा एकूण सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हैदराबाद रोडवरील विडी घरकुल परिसरातील हॉटेल लक्ष्मी या ढाब्यावर अवैधरीत्या ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या चालक राजेश सिद्राम बिंगी आणि त्याठिकाणी दारू पित बसलेले चार ग्राहक अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली होती.
या तीन प्रकरणात ढाबा चालकांसह 19 मद्यपी ग्राहकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली. अटक आरोपींच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या आणि बीअरच्या बाटल्या असा एकूण चार हजार तीनशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास अधिकारी यांनी २४ नोव्हेंबर रोजी एका दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असता दारुबंदी न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी नम्रता बिरादार यांनी तत्काळ निकाल देत तिन्ही ढाबाचालकांना प्रत्येकी २५ हजार आणि मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार असा एकूण एक लाख 13 हजारांचा दंड ठोठावला आहे.
























