Solapur : सोलापुरात अजितदादांची राष्ट्रवादी स्वतंत्र्य लढणार? सर्व जागांसाठी चाचपणी सुरू, गळती रोखण्यासाठीही प्रयत्न
Solapur NCP Politics : राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपात प्रवेशाच्या तयारीत असताना पक्षाकडून सोलापुरात डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न केले जात आहेत.

सोलापूर : युतीचा निर्णय राज्य पातळीवर होईल, मात्र निर्णय येईपर्यंत स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी करा. राज्याचे वरिष्ठ नेते युतीचा जो निर्णय घेतील तो मान्य करू, पण तो पर्यंत आपली संपूर्ण तयारी करून ठेवा अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी पदाधिकाऱ्यांच्या दिल्या.
राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापुरात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सोलापुरात भाजपच्या मिशन लोटसमध्ये राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून डॅमेज कंट्रोलसाठी शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी बैठक घेण्यात आली.
Solapur Elections : महापालिकेत स्वतंत्र लढण्याची तयारी करा
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र निवडणुकीची तयारी करा. सोलापूर महापालिका निवडणुकीत सर्व 26 प्रभाग आणि 102 सदस्यांसाठी तयारी करा अशा सूचना दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
Solapur Politics : पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा विचार करणार
पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वांचे म्हणणे ऐकूण घेण्यात आलं. आगामी काळात त्यांच्या सूचनांचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल. महायुतीमध्ये निवडणूक लढवायची आमची इच्छा आहे."
Solapur NCP Meeting : गैरसमज दूर केले जातील
दत्तात्रय भरणे म्हणाले की, "आजपर्यंत आमच्या पक्षातून कोणीही गेलेले नाही, "तुमच्या माध्यमातूनच आम्ही ऐकतोय. काही लोकांचे गैरसमज झालेले असतील तर ते गैरसमज दूर केले जातील. जर कोणी गेलंच तर दुसरी टीम त्या ठिकाणी तयार होईल. आणखी काही मोठे लोकं पक्षात यायला तयार आहेत, येत्या काळात त्यांचे प्रवेश होतील. येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या जागा या गेल्या वेळपेक्षा जास्त असतील."
राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपच्या वाटेवर
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणाऱ्याची शक्यता आहे. कारण तीन माजी आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने हे भाजपच्या वाटेवर आहेत. तर दुसरीकडे सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हेदेखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.
सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो.मात्र, या जिल्ह्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केल्याचे चित्र दिसत आहेत.
























