(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar: माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान; देशभरातील लाखो कष्टकरी शेतकऱ्यांचे हे दैवत; विठूरायाच्या दर्शनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
Sharad Pawar: 2017 नंतर प्रथमच शरद पवार यांनी विठूरायाचे दर्शन घेतले. विठूरायाच्या दर्शनानंतर माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान असल्याचे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar: तब्बल 63 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या वेळाच मंदिरामध्ये देवदर्शनाला जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंढपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी पोहोचले. 2017 नंतर प्रथमच शरद पवार यांनी विठूरायाचे दर्शन घेतले. विठूरायाच्या दर्शनानंतर माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान असल्याचे शरद पवार म्हणाले.
देशभरातील लाखो शेतकरी कष्टकरी शेतकऱ्यांचे ते दैवत असल्याचे शरद पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, मी स्वतःसाठी कधी काही मागत नाही, पण सध्याच्या सरकारमुळे गोरगरीब अडचणीत आले आहेत. शरद पवार हे पुरोगामी बाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. फुले, शाहू, आंबेडकरांचा आदर्श ठेवत त्यांनी राजकीय आयुष्यात मार्गक्रमण केले आहे. गेल्या एक-दोन वर्षातील त्यांचे दोन प्रसंग अपवाद राहिले आहेत. शरद पवार यांनी गेल्यावर्षी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले होते. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील आळंदीत दर्शन घेतले होते.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला होता. मात्र, त्यांचा राजीनामा फेटाळण्यात आल्यानंतर आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रोशामुळे माघार घेत अध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व पार्श्वभूमीवर प्रथमच ते सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंढरपूरला पोहोचले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने बायोगॅस प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते आज होत आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखाना उभारणीत शरद पवार यांचे योगदान आहे. त्यांनी अनेकवेळा मदत केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या