फलटण ते पंढरपूर नवीन रेल्वे मार्गाचे काम दीड वर्षाच्या आत पूर्ण होणार, खासदार रणजित निंबाळकर यांचा दावा
महारेलला नवीन रेल्वे मार्गाचा अनुभव नसल्याने रेल्वे मंत्रालयाकडून फास्ट ट्रॅकवर या मार्गाचे काम करण्याची रेल्वे विभागाची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले .
पंढरपूर: ब्रिटिश काळापासून रखडलेल्या पंढरपूर फलटण (Pandharpur - Phaltan) रेल्वे मार्गाला (Railway Track) अखेर जानेवारी 2024 मध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. काम सुरु झाल्यापासून 12 ते 14 महिन्यात हे 105 किलोमीटरचे काम पूर्ण होईल असा दावा माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी केला आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या नवीन रेल्वेमार्गाचे काम महारेलच्या ऐवजी रेल्वे मंत्रालयाकडून करण्याचा निर्णय केल्याबद्दल निंबाळकर यांनी मुख्यमंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आभार मानले. महारेलला नवीन रेल्वे मार्गाचा अनुभव नसल्याने रेल्वे मंत्रालयाकडून फास्ट ट्रॅकवर या मार्गाचे काम करण्याची रेल्वे विभागाची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले .
रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात जानेवारी 2024 मध्ये होण्याची शक्यता असून केवळ 12 ते 14 महिन्यात ह105 किलोमीटर नवीन रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होईल असा विश्वासही निंबाळकर यांनी व्यक्त केला . फलटण पंढरपूर या नवीन रेल्वेमार्गासाठी खासदार निंबाळकर हे पहिल्यापासून आग्रही असून यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आता रेल्वे मंत्रालयाकडून जलदगतीने हे काम सुरु होण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. फलटण ते पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी अर्थात महारेलने 1482 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प अहवाल बनविला आहे. यामध्ये राज्य सरकार 921 कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार आहे. सध्या या मार्गाचे नव्याने सर्व्हेचे काम देखील पूर्ण झाले असले तरी पंढरपूर शहरासह या मार्गावरील विविध गावात रेल्वेच्या या जागांवर मोठमोठ्या इमारती उभ्या असल्याने त्या हटविणे हि देखील डोकेदुखी ठरणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात 1918 साली इंग्रज सरकारने पंढरपूर ते लोणंद या रेल्वेमार्गाला मंजुरी देऊन जागेचे अधिग्रहण देखील केलेले आहे. मध्यंतरी लोणंद फलटण हा मार्ग पूर्ण करण्यात आला मात्र यानंतर फलटण पंढरपूर रेल्वेमरागचे काम पुन्हा रखडले होते. माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी याचा पाठपुरावा सुरु केल्यावर 2018 मध्ये रेल्वे मंत्र्याने यास मान्यता देऊन सर्व्हेची कामे सुरु केली . एकूण 1482 कोटी रुपये खर्चाच्या या मार्गासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार 50 टक्के हिस्सा उचलणार आहे . मात्र नंतर राज्यात सत्तांतर झाल्याने राज्य सरकारने यास चालना न दिल्याने पुन्हा हा रेल्वे मार्गाचे काम थंडावले होते . आता पुन्हा राज्यात सत्तांतर झाल्याने रखडलेले प्रकल्पास पुन्हा गती मिळाली आहे.
आता राज्य सरकारने हा नवीन रेल्वेमार्ग महारेलच्या ऐवजी रेल्वे मंत्रालयाला करण्यास मंजुरीचा निर्णय घेतल्याने आता या 105 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे . या मार्गावर डोंगर , दऱ्या वगैरे नसल्याने याचा खर्चही कमी होता .याशिवाय ब्रिटिशांनी त्याकाळात सर्व मार्गावरील भूसंपादनाचे काम करून घेतल्याने हा मोठा खर्च आता करावा लागणार नाही . पंढरपूर ते फलटण या नवीन रेल्वेमार्गावर साखर कारखानदारी आणि फळबागांचे जाळे असल्याने कृषी निर्यात देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहे . फलटण ,निम्बलक , नातेपुते , माळशिरस , वेळापूर , भंडीशेगाव , वाखरी आणि पंढरपूर अशा रीतीने या रेल्वेचा मार्ग असणार आहे . पंढरपूरकडे येणाऱ्या विठ्ठलभक्तांसोबत कृषी आणि औद्योगिक विभागालाही याचा मोठा फायदा होऊ शकणार आहे .