पंढरपूर : आषाढी यात्रेपूर्वीच विठ्ठल भक्तांचे तोंड कडू करणारी बातमी आहे. नाही नाही म्हणत अखेर मंदिर समितीने नवीन टेंडरमध्ये विठुरायाच्या लाडू प्रसादात तब्बल दीडपटीने वाढ केल्याने गोरगरीब भाविकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून मंदिर समितीच्या भोंगळ कारभारामुळे आधी भाविकांना लाडू प्रसाद मिळालेला नाही. यानंतर नवीन टेंडरनुसार लाडूचे दर जवळपास दीडपट वाढवल्याने याचा फटका सर्वसामान्य भाविकांना बसणार आहे. मंदिर समितीने लाडू बनवण्यासाठी ठेका देताच लाडूच्या किमतीत दीडपट वाढ झाल्याचं मंदिर समितीच्या सहअध्यक्षांनी सांगितल्याने भाविकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 


गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूची विक्री करण्यास सुरुवात केली होती. वारकऱ्यांमध्ये हा लाडू प्रसाद खूपच लोकप्रिय झाला होता. आम्ही देवाच्या दर्शनाला आल्यावर गावाकडे जाताना प्रसाद म्हणून हा लाडू नेत असतो असं वारकरी सांगतात. वर्षभरात साधारण 50 ते 55 लाख लाडूंची विक्री होऊन समितीला यातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत होतं. कोरोना काळात दोन हा लाडू प्रसाद समितीने बंद केला होता. मंदिर सुरु होऊनही लाडू प्रसाद मिळत नसल्याने भाविकांच्या नाराजी होती. आता आषाढीपूर्वी लाडू देण्याची तयारी असून लाडू प्रसाद मात्र 20 रुपये होणार असल्याचं  मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे. 


खरंतर यावेळी लाडूचे वजन 140 ग्रॅम केल्याचं कारण देत किंमत वाढल्याचं औसेकर सांगत असले तरी पूर्वीचे लाडू देखील 140 ग्रॅम वजनाचेच होते आणि त्यांची किंमत 15 रुपये होती. पूर्वीचे ठेकेदार 140 ग्रॅम वजनाचे 2 लाडू पॅकिंग करुन 12 रुपये 50 पैसेनुसार मंदिर समितीला देत होते. आता त्याच वजनाच्या लाडूसाठी भाविकांचा मात्र खिसा कापला जाणार आहे. आता भाविकांचा खिसा कापून वाढलेली ही किंमत नेमकी कोणाच्या खिशात जाणार, ठेकेदार की मंदिर समिती हे पाहावं लागणार आहे. 


आधी टेंडर प्रक्रियेमुळे भक्तांना लाडू प्रसादासाठी वाट पाहावी लागली
आधी कोरोना, मग टेंडर प्रक्रिया सुरु होण्यासाठी अनेक महिने लागल्याने भाविकांना हा लाडू प्रसाद मिळत नव्हता. मंदिर समितीच्या मे महिन्यात झालेल्या बैठकीत अखेर हे टेंडर उघडण्यास मुहूर्त मिळाला आणि नऊ निविदा धारकांच्यापैकी केवळ दोघांना यात पात्र केलं. जानेवारी 2018 पासून जी सुवर्ण क्रांती महिला बचत गट हे काम करत होतं त्यांना या प्रक्रियेत अपात्र ठरवल्याने या संस्थेचे कायदेशीर सल्लागार दत्तात्रय फडतरे यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाविकांना लाडू प्रसादासाठी वाट पाहावी लागली होती.


संबंधित बातम्या