पंढरपूर : मंदिर समितीच्या सावळ्या गोंधळामुळे गेल्या सहा महिन्यापासून लाखो भाविकांना विकत मिळत असलेला लाडू प्रसाद बंद आहे. आता टेंडर प्रक्रियेबाबत आक्षेप घेत एक संस्था न्यायालयात निघाल्याने अजूनही भक्तांना लाडू प्रसादासाठी वाटच पाहावी लागणार आहे. यापूर्वी अनेक महिने फक्त टेंडर उघडायला वेळ नसल्याने भाविकांना हा लाडूचा प्रसाद मिळत नव्हता. काल (12 मे) मंदिर समितीच्या बैठकीत अखेर हे टेंडर उघडण्यास मुहूर्त मिळाला आणि 9 निविदा धारकांपैकी केवळ दोघांना यात पात्र केल्याने गेल्यावेळी ज्या संस्थेकडे टेंडर होते त्याने या प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. आता ही संस्था न्यायालयात निघाल्याने भाविकांना मात्र आपल्या गावाकडे जाताना लाडूच्या प्रसादाशिवाय जावे लागणार आहे. यामुळे भाविक तीव्र संतापले असून आम्ही देवाच्या दर्शनानंतर घरी कोणता प्रसाद न्यायाचा असा प्रश्न विचारात आहेत .
गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूची विक्री करण्यास सुरुवात केली होती. वारकऱ्यांमध्ये हा लाडू प्रसाद खूपच लोकप्रिय झाल्याने वर्षभरात साधारण 50 ते 55 लाख लाडूंची विक्री होऊन समितीला यातून लाखो रुपयाचे उत्पन्न मिळत होते. कोरोना काळात हा लाडूचा प्रसाद समितीने बंद केला, मात्र यानंतर राज्यातील सर्व मंदिरे सुरु होताच सर्व मंदिरात प्रसाद विक्री सुरु झाली होती. परंतु विठ्ठल मंदिरात लाडूच्या प्रसादाचे ई-टेंडर डिसेंबर 2020 मध्ये काढण्यात आले होते. याला काही संघटनांनी आक्षेप घेतल्यावर याचा अहवाल विधी व न्याय विभागाकडून मागवण्यात आला. हा अहवाल देखील प्राप्त झाला तरी काल हे टेंडर उघडण्यात आले. मात्र जानेवारी 2018 पासून जी सुवर्ण क्रांती महिला बचत गट हे काम करत होते त्यांनाच अपात्र ठरवल्याने या संस्थेचे कायदेशीर सल्लागार दत्तात्रय फडतरे यांनी आता या प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
विठ्ठलाच्या लाडू प्रसादातून समितीला वर्षाला 50 ते 60 लाख रुपयांचे उत्पन्न असते. ही सदोष टेंडर प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकाऱ्याच्या पगारातून मंदिराचा झालेला तोटा वसूल करण्याची मागणी देखील न्यायालयात करणार असल्याचे अॅड खडतर यांनी सांगितले. एक तर टेंडर वेळेत उघडले नाही आणि आता प्रक्रिया सदोष राबवल्याच्या आरोपाने पुन्हा विठ्ठलाचा लाडूचा प्रसाद लटकणार असून भाविकांनी मात्र मंदिर समितीच्या या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मंदिराचे चांगल्या तुपातील हायजेनिक केअरमध्ये बनवलेल्या लाडूचा प्रसाद मिळत नसल्याने आता मंदिर परिसरात जसे मिळतील तसे लाडू, प्रासादिक दुकानदारांकडून विकत नेत आहेत. आम्ही देवाच्या दर्शनाला आल्यावर गावाकडे जाताना प्रसाद म्हणून हा लाडू नेत असतोय मात्र गेल्या चार महिन्यापासून लाडूच विक्रीला नसल्याच्या तक्रारी भाविक करत आहेत.