सोलापूर :  सोलापुरात काल एमआयएमच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मुस्लिम समाजाच्या मोर्चा प्रकरणात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दि यांच्यासह एकूण 10 जणविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान आणि पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवि कलम 143, 147, 188, सार्वजनिक संपत्ती नुकसान  प्रतिबंधक अधिनियमचे कलम 3, महाराष्ट्र पोलीस  अधिनियम कलम 135 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकारणी सरकारी पक्षातर्फे पोलीस हवालदार अजितसिंह देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्य विरोधात त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी भव्य मोर्चा निघाला होता. मोर्चात संतप्त झालेल्या एका गटाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट येथे हुल्लडबाजी केली. तसेच शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी जात असताना गेटची साखळी तोडत आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोर्चाचे आयोजन करणाऱ्या  एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पोपटराव धायतोंडे यांनी दिली.


सोलापुरात एमआयएमच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या नुपूर शर्मा यांनी  केलेल्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्रित जमले. नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदाल यांना अटक करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली. प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलिसांना देखील गर्दी नियंत्रण करणे जिकरीचे झाले होते. गर्दी काहीशी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता.


संबंधित बातम्या :


Solapur Protest : नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात सोलापुरात भव्य मोर्चा, अहमदनगरमध्ये बंदची हाक तर औरंगाबादमध्ये आंदोलन