Pandharpur News : चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं अन् ट्रॅव्हल्स पलटी; 28 भाविक जखमी, तर एकाचा दुर्दैवी मृत्यू
Pandharpur Accident News: देवदर्शनाला निघालेली बस पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 28 भाविक जखमी झाले आहेत.

Pandharpur Accident News: पंढपुरात (Pandharpur News) एक ट्रॅव्हल्स पलटी होऊन देवदर्शनासाठी निघालेले 28 भाविक जखमी झाले आहेत. तर एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक ट्रॅव्हल्स तब्बल 38 भाविकांना घेऊन जात असताना मंगळवेढा तालुक्यातील (Mangalwedha) येड्राव फाटा येथे ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 28 भाविक जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.
एक खासगी ट्रॅव्हल्स 38 भाविकांना घेऊन देवदर्शनासाठी निघाली होती. अशातच सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात येड्राव फाट्यावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. भरधाव असणारी बस पलटी झाली. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात मरवडे रोडवरील येड्राव फाट्यावर झाला.
बस चालक फोनवर बोलत असल्याने नियंत्रण सुटलं, प्रवाशांचा आरोप
मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातील 38 भाविकांनी घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स संपूर्ण भारतभरात देवदर्शनासाठी यात्रा करणार होती. कर्नाटक येथे देवदर्शन करुन ते भाविक पंढरपूरकडे निघाले होते. पहाटे बस येड्राव फाटा येथे आल्यावर ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे बसचा अपघात झाला आणि बस पलटी झाली. ट्रॅव्हल बस अतिवेगाने जात होती. तसेच ड्रायव्हर मोबाईल फोनवर बोलत होता आणि त्यामुळेच त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं असल्याचं जखमी भाविकांनी यावेळी सांगितलं आहे.
एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू, 8 जण गंभर जखमी
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बस पलटी झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ बचावकार्य सुरु केलं. बसमधील भाविकांना तात्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली. तसेच, जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अपघातात एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. उर्वरित भाविकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pune Fire: पुण्यात मंगळवार पेठेत भीषण आग, जुन्या बाजारातील दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
