Umesh Patil : अनगरमध्ये राजन पाटलांचे जंगलराज, उज्ज्वला थिटे ही रणरागिणी त्यांना भिडणार; उमेश पाटलांचा थेट आव्हान
Angar Nagar Panchayat Election : अनगरमध्ये मागच्या साठ वर्षापासून निवडणूकच होऊ दिलेली नाही. त्यामुळे लोकशाहीचा आत्मा मारून टाकण्याचं काम राजन पाटलांनी केलं आहे अशी टीका उमेश पाटलांनी केली.

सोलापूर : अनगरमध्ये राजन पाटील (Rajan Patil) यांचे जंगलराज सुरू असून लोक त्यांना वैतागली आहेत. विधानसभेप्रमाणे आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही जनता त्यांना जागा दाखवणार असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी त्यांना आव्हान दिलं. सगळीच पदं आपल्या घरात असावी अशी त्यांची प्रवृत्ती आहे, त्यामुळेच उज्ज्वला थिटे (Ujwala Thite) यांना नगराध्यक्षपदाचा अर्ज भरू दिला जात नव्हता असा आरोपही त्यांनी केला.
सोलापूरमधील अनगर नगरपंचायत (Angar Nagar Panchayat Election) ही बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये गेलेले राजन पाटील यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली 17 जणांना बिनविरोध निवडून आणलं. पण नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या सूनेच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज आल्याने त्या पदासाठी निवडणूक होणार आहे. उज्ज्वला थिटे यांनी प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला.
राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील म्हणाले की, "60 वर्षानंतर पहिल्यांदा अनगर या गावामध्ये लोकशाहीचा उदय झाला. दंडेलशाही आणि झुंडशाहीच्या जोरावर लोकशाहीच्या मार्गाने ग्रामपंचायतीला अर्ज भरू दिले जात नव्हते. त्यामुळे अनगरची ग्रामपंचायत जी आता नगरपंचायत झाली आहे, ती बिनविरोध होत होती. लोकशाहीचा गळा त्या ठिकाणी दाबण्यात येत होता."
Umesh Patil Vs Rajan Patil : राजन पाटील यांचे जंगलराज
उज्वला थिटे यांनी वाघिणीचं दूध पिलेलं आहे. या रणरागिणीने एकटीने जाऊन अनगर गाठलं आणि पोलिसांना फोन लावला. त्यावेळेस पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित झाली. एका महिलेचा अर्ज दाखल करण्यासाठी AK47, स्टेनगन घेतलेले जवान त्या ठिकाणी तैनात होते. यावरून राजन पाटील यांचे जंगलराज दिसून येतं अशी टीका उमेश पाटलांनी केली.
एका विधवा महिलेला तिच्या घरातून हद्दपार करणारे, तिच्या मुलावर अॅट्रॉसिटीची केस दाखल करणारे, तिचं शेत जाळून टाकणारे हे लोक आहेत. त्या महिलेच्या मुलावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याने त्याला कुठेही प्रवेश दिला जाऊ नये असा उल्लेख त्याच्या दाखल्यावर करण्यात आला होता, अशा प्रकारची केस भारतात कुठेच नसेल. हे अशा प्रकारचं कृत्य या लोकांनी केलं असा आरोपही उमेश पाटलांनी केला.
Ujwala Thite Anagar Election : उज्ज्वला थिटेंना अर्ज भरू दिला नाही
राजन पाटील यांच्यावर टीका करताना उमेश पाटील म्हणाले की, "उज्ज्वला थिटे या उमेदवारी अर्ज दाखल करायला जात असताना रस्त्याच्या आजूबाजूला मागच्या तीन दिवसांपासून हजारो गुंड राजन पाटलांनी उभे केले होते. यादरम्यान त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना माघारी यावं लागलं. हे भारतातलं गाव आहे का अशा पद्धतीचा प्रश्न पडावा असं काम यांनी केलं."
विधानसभेच्या निवडणुकीत लोकांना अनगरकर नको होतं, म्हणून हे परिवर्तन केलं. अशा असंख्य महिला आहेत ज्यांचं आयुष्य बरबाद झालेलं आहे. मात्र त्या बोलू शकत नाहीत असंही उमेश पाटील म्हणाले.
Umesh Patil On Rajan Patil :घाण भाजपमध्ये गेली
राजन पाटलांनी नुकतंच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर बोलताना उमेश पाटील म्हणाले की, "माझ्या पक्षाच्या कृषिमंत्र्याबरोबर मी यांच्या गावात पाहणी करायला गेलेलो असताना कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र अशा पद्धतीची माणसं आता भाजपमध्ये गेलेली आहेत. अशी घाण भाजपमध्ये गेली, त्यामुळे देशभर आणि राज्यभर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे नाव बदनाम होत आहे."
मागच्या साठ वर्षापासून त्या ठिकाणी निवडणूकच होऊ दिलेली नाही. त्यामुळे लोकशाहीचा आत्मा मारून टाकण्याचं काम अनगरकरांनी केलेलं आहे. चांगल्या चांगल्या पुरुषांना कधी धाडस करता आले नाही, मात्र या विधवा महिलेने ते धाडस करून दाखवलं.
आमचा अर्ज वैध ठरणार
उज्वला थिटे यांचा अनगर या गावांमध्ये बंगला आहे, त्यांच्या घरामध्ये एक सोडून दोन दोन टॉयलेट आहेत. तरीसुद्धा त्यांना स्वच्छालय वापरत असल्याचा दाखला का दिला नाही? असा सवालही त्यांनी विचारला.
आम्ही भरलेला अर्ज हा शंभर टक्के टिकणार असून आम्ही अर्जाच्या प्रत्येक पानाचा व्हिडीओ काढलेला आहे. तसेच प्रत्येक पानावर पोच असल्याचा सहीशिक्का निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून घेतलेला आहे. निवडणूक अर्ज भरत असताना अडथळे आणले म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं पाहिजे अशी मागणी उमेश पाटलांनी केली. वेळ पडली तर आम्ही गावात जाऊन प्रचार करणार, आमचे नेते अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची देखील सभा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत असं उमेश पाटील म्हणाले.
ही बातमी वाचा:

























