सोलापूर : पावसाने पाठ फिरवल्याने हैराण झालेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी खुशखबर असून उजनी धरणाचे पाणी वाढत आहे. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार पाऊस सुरू झाल्याने उजनी धरणाकडे 25 हजार क्युसेक विसर्गाने पाणी जमा होऊ लागले आहे. 


पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील चासकमान, वडीवळे, पवना, आंध्रा आणि कासार साई या धरणातून 20 हजार क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यातच उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या पावसामुळे पाच हजार क्यूसेक विसर्गाने पाणी लवकरच उजनी धरणात येण्यास सुरुवात होणार आहे. अजूनही पुणे जिल्ह्यात पावूस सुरू असल्याने उजनी धरणात येणारा विसर्ग वाढू शकणार आहे.  सध्या उजनी धरणामध्ये 18 टक्के जिवंत पाणी साठा असून धरणात 73.33 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. 


संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातच पाण्याअभावी पिके जळू लागल्याने बळीराजाची चिंताही वाढली होती. यातच धरणात कमी पाणीसाठा असल्याने खरिपाची एक पाणीपाळी सोडण्यासही शासन तयार नसल्याने शेतकऱ्यांना संपूर्णपणे पावसावर अवलंबून राहावे लागणार आहे. आज आलेल्या या गोड बातमीमुळे बळीराजा सुखावणार असून उजनी धरण भरावे यासाठी शेतकरी देव पाण्यात घालून बसला आहे.
 
राज्यातील सध्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक शहरांपुढे जलसंकट ओढवले आहे. सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्याने शेतकऱ्यांचा चिंता वाढल्या होत्या. राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने जवळपास दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकणार आहे.  


उजनी धरणाचे कार्यक्षेत्र 134  चौ. किमीचा व्यस्त असून ओलिताखाली 3,97,800  हेक्टर इतके क्षेत्र आहे.  गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात उजनी धरण 100 टक्के भरले होते. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील दोन ते अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. 


पुणे जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला बरसल्यास उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकणार आहे. गेले तीन वर्षे 100 टक्के भरलेले धरण यंदाही 100 टक्के भरल्यास हजारो हेक्टरवरील पिकांना जीवनदान मिळणार आहे. उजनीची पाणीपातळी 50 टक्क्याच्या आसपास गेल्यास खरिप पिकांसाठी उजनी धरणातून कालव्याला पाणी सोडणेही शक्य होणार आहे. 


ही बातमी वाचा: