सोलापूर : सोलापूर (Solapur News) जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पंढरपूर, सांगोला, शहरांना उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, पिकांना पाणी सोडण्याबाबत निर्णय न झाल्याने बळीराजाच्या चिंता वाढल्यात. काल सोलापूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये उजनी धरणातून जिल्ह्यातील पिकांना एकवेळा पाणी सोडल्यास पिकांना जीवनदान मिळेल अशी मागणी जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी केली होती मात्र सध्या उजनी धरणात केवळ 18 टक्के पाणीसाठा असल्याने याबाबत कोणतीच घोषणा न झाल्याने आता शेतातील माना टाकणाऱ्या पिकांसाठी बळीराजाला परतीच्या पावसावर अवलंबून राहावे लागणार आहे .
सध्या पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या शहरात पाणीटंचाई सुरु असल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे . अशावेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गांभीर्याने सोडवावा अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार साधारण 15 सप्टेंबर रोजी उजनी धरणातून दीड टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात येणार असले तरी सोलापूर शहराला मात्र कर्नाटकाच्या अलमट्टी धरणातील कालव्यातून पाण्याची मागणी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जलसंपदा विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. प्रत्येक वेळी सोलापूर शहराला देखील उजनी धरणातून भीमा नदीत पाणी दिले जात असे.
यंदा उजनीचे अवस्था चिंताजनक असल्याने सोलापूर शहराला अलमट्टी मधून पाण्याचा प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . यासर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली असून पिकासोबत जनावरांचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न देखील दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे . आता परतीच्या पावसाने साथ दिली तर शेतातील उभी पिके कशीतरी वाचू शकणार असून अन्यथा भीषण अवस्थेला सामोरे जावे लागणार आहे.
राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत केवळ चारच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा
राज्यातील (Maharashtra) पिण्याची पाण्याची (Water) वणवण सुरुच आहे. जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आधीच असलेली तूट आणि वाढत जात असलेल्या तापमानामुळे राज्यातील धरणसाठे मागच्या वर्षीची सरासरी देखील गाठतील की नाही अशी चिंता आहे. राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत केवळ चारच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे. राज्यात मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 16 धरणं काठोकाठ भरली होती.
हे ही वाचा :
राज्यातील धरणे पावसाविना कोरडीठाक, सप्टेंबर उजाडला उजनी धरणात 16 टक्के तर जायकवाडी धरणात 34 टक्के पाणीसाठा