Maharashtra Pandharpur News: गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं भाविकांकडून होत असलेल्या मागणीची अखेर पूर्तता झाली. गुढी पाडव्यापासून पंढरपुरात (Pandharpur News) विठुरायाच्या तुळशी अर्चन पूजेस सुरुवात होणार असल्याची माहिती मंदिर समिती (Vitthal Temple) सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. ज्याला महापूजा, पाद्यपूजा करता येत नाही, अशा  कुटुंबाला आलेल्या कोणत्याही दिवशी ही पूजा करता येणार आहे. त्यामुळे देशभरातून आलेल्या भाविकांना आता जास्तीतजास्त प्रमाणात देवाच्या पूजेचा आनंद घेता येणार आहे. 


देवाच्या महापूजेसाठी आणि पाद्यपूजेसाठी भाविकांमध्ये मोठी मागणी असते. मात्र या पूजा मर्यादित संख्येत असल्यानं या पूजेसाठी भाविकांचा नंबर लागत नाही. अनेक भाविक देवाच्या पूजेसाठी नवस करतात किंवा अनेकांना पंढरपूरला आल्यावर देवाची पूजा करायची इच्छा असते. मात्र आजवर तशी व्यवस्थाच नसल्यानं भाविकांचा हिरमोड होत होता. यासाठी भाविकांकडून सातत्यानं किमान तुळशी अर्चन पूजा सुरू करण्याची मागणी होत होती. मंदिर समितीनं हा निर्णय घेतल्यानं आता सण आणि महत्वाचा यात्रा कालावधी वगळता, रोज येणाऱ्या भाविकांना दिवसातून 3 वेळा पूजा करता यावी, अशी व्यवस्था समितीनं केली आहे. या प्रत्येक वेळेत किमान 10 कुटुंबाना ही पूजा करता येणार आहे. सकाळी नैवेद्याच्यावेळी, दुपारी पोशाखाच्या वेळी आणि सायंकाळी धूपार्तीच्या वेळी या पूजा होणार असून रोज किमान 30 कुटुंबाना या पूजा करता येणार आहेत. 


देशभरातील भाविकांना करता येत नसल्यानं या पूजेत उत्सव मूर्तीवर तुळशी अर्चन पूजेचा संकल्प करून या पूजेतील कुटुंबाला देवाच्या पायावर तुळशी अर्पण करता येतील. या शिवाय  भाविकांना देवाचा प्रसाद समितीकडून दिला जाणार आहे. यामुळे या कुटुंबाना देवाची पूजा तर करता येईल, शिवाय विठुरायाच्या चरणावर तुळशी देखील अर्पण करता येणार आहेत. या पूजेसाठी एका कुटुंबाला 2100 रुपये मंदिर समितीकडे भरावे लागणार असून देवाची पूजा, दर्शन आणि प्रसाद असा तिहेरी लाभ या भाविकांना मिळणार आहे. सध्या रोज 30 पूजा होणार असल्या तरी भाविकांची मागणी वाढल्यास पूजेची संख्या देखील वाढवली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन रांगेत कोणतीही अडचण येणार नसली तरी तथाकथित व्हीआयपी दर्शनाला मात्र चाप बसून मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pandharpur News : वारकरी भक्तांसाठी खूशखबर, विनामूल्य सेवा देण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांना आता विठ्ठल मंदिरात वर्षभर सेवा करता येणार