Pandharpur News : विठ्ठल मंदिरात (Vitthal Temple) विनामूल्य सेवा देण्याची इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांकडून (Devotee) व्यक्त केली होती. अशातच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी या व्यवस्थेचे संकेत दिल्याने वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये खुशीचे वातावरण आहे. खऱ्या अर्थाने विठ्ठल मंदिर वारकऱ्यांचे असल्याची भावना या निर्णयातून समोर येत असून आम्ही मोफत देवाची सेवा करण्यास तयार असल्याच्या भावना विठ्ठल भक्तातून व्यक्त होत आहेत.
गावं आणि धार्मिक संस्थांकडून मोफत सेवा देण्याची तयारी
राज्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्यासह गोंदवलेकर महाराज आणि इतर अनेक देवस्थानात भाविकांच्याकडून विनामूल्य सेवा देण्याची व्यवस्था कार्यरत आहे. यामध्ये अधिकारी, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्य भाविक मोफत सेवा देत असतात. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देखील वारकऱ्यांच्याप्रती सेवा भाव दाखवत अशी सेवा देण्याबाबत भाविकांकडून मागणी होत होती. अशा पद्धतीची सेवा करण्याची संधी मिळाल्यास राज्यभरातील अनेक गावे आणि विविध धार्मिक संस्थांकडूनही मोफत सेवा देण्याची तयारी दाखवण्यात येत आहे.
प्रायोगिक तत्वावर मोफत विठ्ठल सेवेचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय
सध्या विठ्ठल मंदिरात 272 कर्मचारी आणि शेकडो हंगामी कर्मचाऱ्यांच्या मदतीने विठ्ठल मंदिर प्रशासन सेवा देत असते. यामुळे भाविकांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी होत असते. एका बाजूला सेवाभावी वृत्तीने राज्यभरातील हजारो विठ्ठल भक्त देवाला मोफत सेवा देण्यास तयार असताना भाविकांच्या पैशाची उधळपट्टी का असा सवाल होत होता. आता मंदिर प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर मोफत विठ्ठल सेवेचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतल्याने विठ्ठल भक्तांकडून वारकऱ्यांना चांगली वागणूक तर मिळेल याशिवाय मंदिराकडे येणार पैसे भाविकांच्या विकास कामासाठी वापरता येणार आहे .
महिला वर्गाचाही मोठा प्रतिसाद
या पद्धतीने सेवा देण्याबाबत आराखडा तयार केला जाईल असे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले असून विठ्ठल मंदिरात 365 दिवस 24 तास सेवा द्याव्या लागतात. यासाठी सेवा देऊ इच्छिणाऱ्या भाविकांकडून माहिती मागवण्यात येणार असून त्यांना त्यांच्या सेवा, अटी शर्ती आणि कालावधी ठरवून दिल्यावर या व्यवस्थेची सुरुवात होणार आहे. दरम्यान आमच्या राहण्याची व्यवस्था केली तर आम्ही विठ्ठल मंदिरात मोफत सेवा देण्यास तयार असल्याची भावना विठ्ठलभक्तांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यात महिलावर्गाचा देखील मोठा प्रतिसाद येत असून आता मंदिर समितीने शासनाच्या मदतीने अशा पद्धतीची सेवा सुरु केल्यास विठ्ठल मंदिर खऱ्या अर्थाने विठ्ठल भक्तांच्या ताब्यात येणार आहे. याशिवाय मंदिरात वारंवार होत असणारे वादावर पडदा पडून मंदिराच्या कारभारात पारदर्शकता येऊ शकणार आहे. विठ्ठल मंदिर, दर्शन व्यवस्था, अन्न छत्र, परिवार देवता अशा ठिकाणी ही मोफत सेवा वापरता येणार आहे.