Solapur Crime News : सोलापूरच्या (Solapur) सदर बाझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार समोर आला असून, अठरा दिवसांच्या नवजात बाळाला तीन लाखांना विकण्यात आल्याचं प्रकार उघडकीस आला आहे. तर बाळाला विकल्याप्रकरणी आई-वडिलांसह, त्या बाळाला विकण्यासाठी मदत केलेल्या सर्व 10 जणांवर अल्पवयीन न्याय कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी पूजा यांनी एका मुलाला जन्म दिला. ते बाळ आजारी असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत होते. दरम्यान यावेळी ओळखीतील आरोपी महिला बाळाच्या आईला म्हणाली की तुला तीन मुले आहेत. शिवाय तुझा नवरा दारुडा आहे. त्याला कसे संभाळणार. मी एका डॉक्टराला ओळखते. तो त्या मुलावर मोफतमध्ये उपचार करेल. त्यानंतर आईला त्या महिलेने मरीआई चौकात बोलावून बाळाची मागणी केली. त्यावेळी आइने बाळाला दिले नाही. त्यानंतर महिलेने परत 9 मे रोजी सकाळी आईला बाळासह जिल्हा परिषदेच्या दर्ग्याजवळ येण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने व तिच्या इतर साथीदारांनी बाळ दत्तक देत असल्याचा बॉन्ड करुन त्यावर सही घेतली; पण बाळ कोणाला देण्यात येत आहे याचा उल्लेख केला नाही, अशा आईने सदर बाझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले होते.
दरम्यान, पोलिसांना हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी या घटनेचा उलट तपास सुरु केला. ज्यात आईनेच बाळ आरोपींना तीन लाखांना विकल्याचे निष्पन्न झाले. शिवाय या व्यवहारासाठी अन्य एका महिलेने 80 हजार रुपये काढून घेत बाळाच्या आईला दोन लाख 20 हजार रुपये दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी बाळाला विकल्याप्रकरणी आई-वडिलांसह, त्या बाळाला विकण्यासाठी मदत केलेल्या सर्व 10 जणांवर अल्पवयीन न्याय कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दत्तक दिल्याचा खोटा बॉन्ड तयार केला...
आई-वडिलांनी बाळ दत्तक दिल्याचा खोटा बॉन्ड तयार करुन त्यावर बाळ घेणाऱ्याचे नाव न लिहिता ते बाळ अन्य एका महिलेला विकले. तर कोणतीही दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया न करता बाळ दुसऱ्याच एका महिलेला बेकायदेशीररित्या संभाळण्यास दिले. त्यामुळे पोलिसांनी आई-वडिलांसह त्यांना मदत करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: