सोलापूर : मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात लम्पी रोगाने (Lumpy Skin Disease) पशुपालक हैराण झाले असून, लाखो रुपये किमतीची जनावरे या रोगामुळे दगावली आहेत. तर, शासनाकडून होत असलेल्या उपाययोजनाही पूर्णपणे काम करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संसर्ग थांबवण्यासाठी शासनाला गुरांचे बाजार, बैलांच्या शर्यतींवर निर्बंध आणण्याची वेळ आली आहे. अशावेळी सांगोला तालुक्यातील महूद गावाच्या एका कपडे व्यापाऱ्याने जनावरांसाठी आता पीपीई किट (PPE Kit) बनवली आहे. यामुळे लम्पीचा धोका टाळून संसर्ग देखील रोखता येण्याचा दावा जितेंद्र बाजारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे अतिशय कमी किमतीत यामुळे आपले पशुधन वाचवता येईल यासाठी शासनाने हा प्रयोगाचा वापर करण्याचे आवाहन देखील बाजारे यांनी केले आहे. 


जनावरांवर लम्पीचा धोका वाढू लागल्यावर बाजारे यांनी याचा नीट अभ्यास करून जनावरांसाठी पीपीई किट बनविण्याचा प्रयोग केला. सुरुवातीला यासाठी कॉटन कापडाचे किट बनवून पहिले. त्यानंतर त्यांनी 90 जीएसएम जाडीचे नॉन ओवन फॅब्रिक घेऊन त्यापासून पीपीई किट बनवली. ही किट बनविताना त्या किटला काही विशिष्ट ठिकाणी कप्पे करून त्यात डांबर गोळ्या ठेवल्या. एक माणूस सहजासहजी ही किट जनावरांना घालू शकेल अशा पद्धतीने या किटची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे किट असतांना देखील गुरांची तपासणी, दूध काढणे शक्य आहे. बाजारे यांच्या गोठ्यात गेल्या 20 वर्षांपासून 55 जनावरे आहे. त्यामुळे त्यांनी या किटची पहिली ट्रायल आपल्या गोठ्यातील जनावरांवर केली. 


शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पशुधन वाचण्यास मदत 


बाजारे यांनी सुरवातीला लम्पी झालेल्या एका गाईला ही किट घातली. त्यामुळे ती गाय वाचलीच शिवाय, त्याचा संसर्ग इतर गायींना देखील झाला नाही. बाजारे यांनी यानंतर सांगोला तालुक्यातील लम्पीची साथ मोठ्या प्रमाणात असणाऱ्या लोटेवाडी, अजनाळे, माळशिरस, शंकरनगर अशा विविध गावात जाऊन या किटचा प्रयोग केला. यामुळे, लम्पीचा संसर्ग झालेले जनावरे वाचली असून, त्यांचा प्रादुर्भाव इतर जनावरांना न झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पशुधन वाचण्यास मदत झाली. 


साधारण 1300  ते 1400  रुपयाच्या खर्चात किट मिळणार...


तर, आपण बनवलेले पीपीई किट साधारण 1300  ते 1400 रुपयाच्या खर्चात तयार होत असून, यामुळे लाखो रुपयांच्या पशुधनाचे संरक्षण होत असल्याने शासनाने हे पीपीई किट वापरून लम्पी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जितेंद्र बाजारे यांनी केले आहे. लम्पी या संसर्गजन्य रोगामुळे आत्तापर्यंत राज्यभरात हजारो मुक्या जनावरांचे प्राण गेल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारे यांनी केलेल्या या पीपीई किटमुळे जर खरेच लम्पी संसर्ग रोखणे शक्य होत असेल, तर कोविडनंतर आता लम्पीसाठी जनावरांच्या पीपीई किटचा प्रयोग होऊ शकणार आहे. 


कोविड काळात देखील बनवल्या पीपीई किट


बाजारे हे महूद येथील रहिवासी असून, एक आदर्श पशुपालक देखील आहेत. ते आदर्श गोपालक पुरस्कार प्राप्त गोठ्याचे मालक असून, त्यांचेकडे असणाऱ्या जनावरांवर प्रयोग केल्याने येथे लम्पीला शिरकाव होऊ शकलेला नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यासमंडळाचे जितेंद्र बाजारे हे सदस्य म्हणून काम करतात. बाजारे यांचा अकलूज येथे भक्ती गारमेंट म्हणून कपडे शिवण्याचा व्यवसाय आहे. यापूर्वी त्यांनी कोविड काळात हजारोच्या संख्येने पीपीई किट आणि मास्क बनवून डॉक्टरांची मोठी मदत केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Dhule News : धुळे जिल्ह्यात 52 गावांमध्ये लम्पिचा शिरकाव, अडीच महिन्यात 1 हजार 353 जनावरांना लागण, 35 जनावरांचा मृत्यू