सोलापूर: गेल्या वर्षीची साखर विक्री आणि इथेनॉल विक्रीतून मिळालेला पैसा कारखानदारांकडे तसाच आहे, त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा (FRP) 400 रुपये ज्यादा दर द्यावेत, अन्यथा कारखाना सुरू होऊ देणार नाही अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे. कारखान्याची बॅलेन्स शीट पाहिली तर ते सहज शक्य आहे असंही ते म्हणाले.
मागील वर्षी साखर कारखान्यांनी साखर विक्रीतून किमान पाचशे रुपये कमावलेले आहे. इथेनॉल विक्रीतून हे पैसे अधिकचे मिळवले आहेत, साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉल उत्पादन करण्यात आले आहे. प्रत्येक कारखान्याने तीन ते चार टक्के रिकवरी हे इथेनॉल निर्मितीसाठी वापरली आहे. हे सर्व पैसे कारखान्याकडे आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी एफआरपी पेक्षा चारशे रुपये अधिक देण्यात यावे अशी मागणी आम्ही करत आहोत. हे सहज शक्य आहे, खासगी आणि सहकारी कारखान्याची बॅलन्स शीट पहिली तर आपल्याला हे लक्षात येईल.
एफआरपी पेक्षा अधिक चारशे रुपये दिल्याशिवाय यंदाचा सिझन सुरू होऊ देणार नाही आमची ठाम भूमिका आहे असं राजू शेट्टी म्हणाले. ते म्हणाले की, थकित ऊस बिला संदर्भात आमची साखर आयुक्त सोबत दोन वेळा बैठक झाली. ज्यांनी एफ आर पी नुसार पैसे दिले नाहीत त्यांना क्रशिंग लायसन दिले जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. क्रशिंग लायसन न घेता जर कारखाना सुरू केला तर वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आम्ही ते कारखाने बंद पाडू.
चेन्नई सुरत मार्गासाठी शेतकऱ्यांना चौपट रक्कम द्या
सुरत-चेन्नई मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत. त्यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांनी ही जमीन पिढ्यानपिढ्या सांभाळली आहे. फक्त कायदा करून सरकार या जमिनी ताब्यात घेऊ शकत नाही. घ्यायचीच असेल तर 2013 च्या केंद्र शासनाच्या कायद्यानुसार बाजारभावाच्या चौपट रक्कम देऊन भूसंपादन करावे. अधिकार नसताना राज्य शासनाने या कायद्यात दुरुस्ती करून रक्कम केवळ दुप्पट केली. त्यात ही 20 टक्के कपात केली. हा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नाही, वेळप्रसंगी शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयावर आम्ही धडक मारू.
सुभाष देशमुखांचे कर्ज प्रकरण ईडीसाठी चांगलं प्रकरण
माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या लोकमंगल कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यासंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "ईडीसाठी हे चांगलं प्रकरण आहे. शेतकऱ्यांची KYC न घेता त्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतले जातात, आणि वापरले जातात. हा मोठा आर्थिक घोटाळा आहे. इतका मोठा घोटाळा ईडीला कसं माहिती नाही हे मला समजतं नाही."
बच्चू कडूंचा सरकारमध्ये भ्रमनिरास झाला
आमदार बच्चू कडू यांच्यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, बच्चू कडू माझे जुने मित्र आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही एकत्र लढलो आहोत. सरकारमध्ये जाऊन त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे मला वाटतंय त्यांनी माघारी फिरावे. पुन्हा एकदा मैदानात उतरावे, विदर्भात त्यांची ताकद चांगली आहे, विदर्भ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पेटून उठावं. 2017 साली कर्जमाफीसाठी आम्ही एकत्रित लढलो होतो. बच्चू कडू यांनी घरवापसी करावी, लोकं त्यांचं स्वागत करतील.
ही बातमी वाचा: