IPS Anjana Krishna : अजित पवारांच्या 'दादागिरी' विरोधात नागरिक एकवटले, IPS अंजना कृष्णांच्या समर्थनार्थ अनोखं आंदोलन; नेमकं काय घडलं?
IPS Anjana Krishna : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणानंतर IPS अंजना कृष्णा चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

IPS Anjana Krishna : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणानंतर चर्चेत आलेल्या करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक (DYSP) अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्या समर्थनार्थ करमाळा तालुक्यात जनतेकडून अनोखे आंदोलन पाहायला मिळत आहे. जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळ्याच्या आराध्य दैवत आई कमलाभवानी मंदिरासमोर अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून गांधीगिरी शैलीत आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांचा इशारा
या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करताना जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी सांगितले की, “अंजना कृष्णा या एक निर्भीड, जबाबदार महिला अधिकारी आहेत. त्यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. महाराष्ट्रात स्त्रियांना सन्मान दिला जातो, आणि हा अपमान सहन केला जाणार नाही,” असे त्यांनी म्हटले. तर "लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही," अशा आशयाच्या बॅनरच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.
नेमकं काय घडलं होतं?
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारींनंतर DYSP अंजना कृष्णा घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक ग्रामस्थांशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. याच वेळी एका स्थानिक शेतकऱ्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून, त्यांचं बोलणं DYSP कृष्णा यांच्याशी करून दिलं.
या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अंजना कृष्णा यांनी अजित पवार यांचा आवाज ओळखला नसल्याने, "तुमची इतकी हिंमत की मला ओळखलं नाही?" अशा शब्दांत पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे ऐकू येते. त्यावर अंजना कृष्णा यांनी, "तुम्ही माझ्या वैयक्तिक फोनवर कॉल करा" असे उत्तर दिले. यामुळे अजित पवार संतापले आणि "मी तुमच्यावर कारवाई करीन" असा इशारा दिल्याचेही व्हिडिओत दिसून येते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्टीकरण
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून, विरोधकांकडून खोडसाळपणा करून हा प्रचार करण्यात येत असून, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्यावर कारवाई करा, असे पवारांचे सांगणे होते; परंतु ते दम देत असल्याचा खोटा प्रचार करणे गैर असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल
अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता हळूहळू वाढ होत आहे. अतुल खूपसे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र त्याआधीच सोलापूर पोलिसांनी 15 ते 20 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तरीही स्थानिक जनतेतून अंजना कृष्णा यांना पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे.
आणखी वाचा























