Solapur News : बारावीच्या गणिताच्या पेपरदिवशीच वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलगा पेपर देऊन परत आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना घडली. शुक्रवारी सकाळी जत तालुक्यातील उमदीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती या गावात घडलेल्या घटनेनं सगळेच शोकाकूल झाले. हुलजंतीमधील कल्लाप्पा आबा रूपटक्के (वय 60) यांचे शुक्रवारी (3 मार्च) सकाळी आकस्मिक निधन झाल्याने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. अंत्यविधीसाठी लोक जमा होत असतानाच मयत कल्लाप्पा रूपटक्के यांचा मुलगा तुकाराम कलाप्पा रूपटक्के (वय 18) याचा बारावीचा गणित पेपर सकाळी साडेदहा होता. 


ग्रामस्थांनी तुकारामची बारावीची परीक्षा चालू आहे, त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हुलजंतीचे माजी सरपंच गोविंद भोरकडे व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी ग्रामस्थांसमोर आपली भूमिका मांडत तुकारामला पेपरला पाठवून दिले आणि मयत कलाप्पा रुपटके यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली. मुलगा तुकाराम परीक्षा देऊन आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले.


हीच वडिलांना खरी श्रद्धांजली


तुकाराम सोड्डी येथील एमपी मानसिंग विद्यालयात परीक्षेसाठी गेल्याची माहिती प्राचार्य बसवराज कोरे यांना देण्यात आली. परीक्षा होईपर्यंत अंत्यविधी दुपारपर्यंत पुढे ढकलण्यात आला. तुकारामने काळजावर दगड ठेवून कसाबसा गणितचा पेपर दिला. एकीकडे डोळ्यात अश्रू परंतु दुसरीकडे आयुष्याची परीक्षा या दुहेरी संकटात सापडलेल्या तुकारामने सोड्डी परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर दिला. वडीलाचे प्रेत घरात असूनही पेपर दिला, नंतर वडिलांचे अंत्यविधी करण्यात आले. घरची परिस्थिती हालकीची आई मूकबधिर. गावात फारसे नातेवाईक नाहीत. परंतु ग्रामस्थांनी सर्वांनी एकत्रित येत कलाप्पा रूपटक्के यांच्या अंत्यविधीची तयारी केली. त्याचबरोबर तुकारामला धीर देण्यात आला.


तुकारामने आदर्श निर्माण केला


आमच्या प्रशालेतील इयत्ता बारावी शिकत असणारा विज्ञान शाखेचा तुकारामने वडिलांचे निधन झाले असतानाही गणिताचा  पेपर कसा द्यायचा? अशा द्विधा मनस्थितीत होता. तुकारामने अखेर गणिताचा पेपर देत अंत्यसंस्कार नंतर करायचा निर्णय घेतला. तुकारामने भविष्याचा वेध घेत हा निर्णय  घेतला. या ठोस कृतीने तुकारामने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला असल्याची प्रतिक्रिया एमपी मानसिंग विद्यालयाचे प्राचार्य बसवराज कोरे यांनी दिली. 


मी खूप शिकावं आणि पोलीस अधिकारी व्हावं, वडिलांची इच्छा


मी खूप शिकावं आणि पोलीस अधिकारी व्हावं अशी वडिलांची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. म्हणून काळजावर दगड ठेवत  वडिलांच्या अंत्यविधीसाठी सर्व ग्रामस्थ व नातेवाईक घरासमोर जमा झाले असतानाही बारावीचा गणितचा पेपर दिला. हीच वडिलांना खरी श्रद्धांजली, असल्याची प्रतिक्रिया मुलगा तुकारामने दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या