Solapur News Update : पंढरपूर तालुक्यातील दोन विद्यार्थीनींचा अपघाती मृत्यू झालाय. यातील एक घटना पंढरपूर तालुक्यातील करकंब भागामध्ये घडली आहे तर एक घटना भोसे येथे घडली आहे. अक्षरा जमदाडे आणि राधा नवनाथ आवटे असे अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही मुलींची नावे आहेत.
भोसे येथील देविदास जमदाडे यांची कन्या अक्षरा ही आज सकाळी शाळा सुटल्यानंतर शाळेतून आपल्या घरी येत होती. यावेळी भोसे पाटी येथे अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. यामध्ये अक्षराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत दहावीचा मराठीचा पेपर देऊन भावासोबत घरी जाणाऱ्या राधा हिचा गाडीवर झाड पडून जागीच मृत्यू झाला. बार्डी पाटी-करकंब येथेही दुर्दैवी घटना घडली आहेत. एकाच दिवशी परिसरातील दोन शाळकरी विद्यार्थीनींचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अक्षरा जमदाडे ही भोसे येथील यशवंत विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. ती गुरुवारी 11 वाजण्याच्या सुमारास आपली शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. भोसे पाटी येथे आल्यानंतर अक्षरा ज्या पीकअपमध्ये बसली होती त्याचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याने त्याचा धक्का बसून अक्षरा ही बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायर खाली पडली, यामध्ये अक्षराचा मृत्यू झाला आहे. अक्षराच्या मृत्यूने भोसे परिसरावर शोककळा पसरली आहे. तर दुसऱ्या घटनेत दहावीचा पेपर देऊन परतत असताना गाडीवर झाड पडून राधा या दहावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला.
राधा आवटे ही पेहे येथील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देऊन घरी परत जात होती. त्यावेळी तिच्या अंगावर जळणारं झाड पडलं. या झाडाला नेमकी आग कशी लागली, याचा तपास यंत्रणा करत आहेत. राधा ही मुळची बादलकोटची राहणारी होती. दहावीचा पेपर संपल्यानंतर राधा तिचा भाऊ संदीप याच्या सोबत दुचाकीवरून ढेकळेवाडीला नातेवाईकांकडे जात होती. बार्डी रोड वरील एमएसईबी कार्यालयाच्या पुढे रस्त्याच्या बाजूला असलेलं पेटलेलं झाड राधाच्या अंगावर पडलं, त्यामध्ये राधाच्या डोक्याला जोराचा मार लागला. अपघातानंतर राधाला करकंब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच राधाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या झाडाला आग कशामुळे लागली होती याचं कारण अद्याप समजलं नसून पोलिस त्याबाबत अधित तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या