सिंधुदुर्ग : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या (Helium) शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग (Vijaydurg) किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायूचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आजचा दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करणार आहेत.


विजयदुर्ग किल्यावर जोसेफ नॉर्मन लॉकियर (Sir Joseph Norman Lockyer) या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञाने 18 ऑगस्ट 1868 रोजी हेलियम वायूचा शोध घेतला. सूर्यकिरणाचे निरीक्षण करतावेळी हा शोध घेण्यात आला. ग्रीक देव 'हेलियस'च्या नावावरून या वायूला हेलियम हे नाव देण्यात आले. विजयदुर्गवर ज्या ठिकाणाहून हेलियमचा शोध लागला त्या जागेला साहेबांचा कट्टा असं म्हटलं जातं. या कट्ट्यावरून जोसेफ नॉर्मन लॉकियर आकाशाचं निरीक्षण करायचा. 


हेलियमच्या शोधाच्या निमित्ताने आजचा दिवस म्हणजे 18 ऑगस्ट रोजी जागतिक हेलियम दिन साजरा केला जातो. भविष्यात विद्यार्थी आणि पर्यटकांच्या अभ्यासासाठी खगोल अभ्यासाची गोडी वाढण्यासाठी हेलियम डे (Helium Day) साजरा केला जातो. विजयदुर्गच्या ज्या ठिकाणी हेलियमचा शोध लावण्यात आला त्या ठिकाणी या ठिकाणचे नागरिक आणि विद्यार्थी हेलियम दिन साजरा करणार आहेत. 


कसा आहे हेलियम वायू? 


हेलियम हा असा एक घटक आहे, की जो प्रथम पृथ्वीवर न शोधता अवकाशात शोधला गेला. त्याचा अणूक्रमांक 2 आहे. हा रंग, वास आणि चवविरहित असा वायू आहे. हा बिनविषारी तसेच एकाणू वायू आहे. याचा समावेश 'नोबल गॅस ग्रुप'मध्ये होतो. हायड्रोजननंतर हा दुसरा हलका वायू आहे. हेलियम वायूचा उपयोग स्कुबा डायव्हिंगमध्येही करतात. श्वास घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टाकीत 20 टक्के ऑक्सिजन व 80 टक्के हेलियम वायू असतो. स्कुबा डायव्हर्सना अतिरिक्त वजन घ्यावे लागू नये म्हणून हा वायू उपयुक्त ठरतो. रआय यंत्रामध्ये चुंबकासाठी शीतकारक म्हणून हेलियमचा वापर होतो. बलून्समध्येही हेलियमचा वापर होतो.


फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ ज्युलस जेनसिन याने सूर्यग्रहणाच्या वेळी पिवळ्या ज्वाळेच्या रुपात हेलियम शोधला. जोसेफ नॉर्मन लॅकियर या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञानेही सूर्यावर पिवळी रेषा पाहिली. दोन्ही शास्त्रज्ञांची निरीक्षणे फ्रेंच सायन्स अॅकॅडमीकडे एकाच वेळी पोहोचली म्हणून हेलियमच्या संशोधनाचे श्रेय दोघांकडेही गेलं. मात्र त्या वेळी इतर शास्त्रज्ञांना या दोघांच्या निरीक्षणावर आणि नवीन वायूच्या शोधावर विश्वास नव्हता. 30 वर्षांनंतर स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ विल्यम रॅमसे याने युरेनियमच्या खाणीत पृथ्वीच्या पोटातील एक नवीन वायू शोधला. शेवटी तिन्ही शास्त्रज्ञांचा फ्रेंच सरकारने सुवर्णपदके देऊन सत्कार केला. अशाप्रकारे हेलियमच्या संशोधनात तिन्ही शास्त्रज्ञांचे नाव घेतले जाते.


ही बातमी वाचा: