मुंबई: पाच लाखाहून जास्त प्रीमियम असलेल्या आयुर्विमा पॉलिसीला (Life Insurance Policies) आता कर सवलत मिळणार नसून त्याच्या उत्पन्नावर आयकर (Income Tax) लागू होणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर कायद्यात सुधारणा केली असून त्यानुसार हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या पॉलिसींसाठी हा नियम लागू होणार आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023) पाच लाखाहून जास्त प्रीमियम असलेल्या विमा पॉलिसीवरील कर सवलत हटवण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्याची आता अंमलबजावणी होणार आहे. 


वार्षिक प्रीमियम पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयुर्विमा पॉलिसीमधून (Life Insurance Policies) मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना करण्यासाठी आयकर विभागाने नियम तयार केले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Taxes - CBDT) 16 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये आयकर कायदा, 1961 च्या कलम 10 च्या कलम (10D) अंतर्गत नवीन मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित करण्यात आली आहेत. या कलमांतर्गत आयुर्विमा पॉलिसीच्या खरेदीच्या रकमेवर आयकर सवलत नमूद केली आहे.


नवीन नियम काय आहे?


ज्यांच्या विमा प्रिमियमची रक्कम (Life Insurance Policies) ही पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना आता विम्यातून मिळणारी कर सूट मिळणार नाही. नवीन सुधारणेनुसार, 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या पॉलिसींसाठी, कलम 10 (10D) अंतर्गत मॅच्युरिटी बेनिफिटवरील कर सवलत केवळ तेव्हाच लागू होईल जेव्हा एखाद्या व्यक्तीने भरलेले एकूण प्रीमियम वार्षिक पाच लाखांपेक्षा जास्त नसेल. 


या मर्यादेपेक्षा अधिक प्रीमियमसाठी प्राप्त झालेली रक्कम उत्पन्नात जोडली जाईल आणि त्यावर कर आकारला जाईल. ULIPs (युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स) वगळता जीवन विमा पॉलिसींच्या संदर्भात कर तरतूदीतील बदल आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले होते.


मृत्यूच्या रकमेची तरतूद काय आहे?


एएमआरजी अँड असोसिएट्सचे संयुक्त भागीदार ओम राजपुरोहित यांनी सांगितले की, मुदतपूर्तीवर प्राप्त झालेल्या कोणत्याही अतिरिक्त रकमेवर 'इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न' या श्रेणीत कर आकारला जाईल. विमाधारकाच्या मृत्यूवर प्राप्त झालेल्या रकमेसाठी कर आकारणीच्या तरतुदी बदलल्या नाहीत आणि पूर्वीप्रमाणेच प्राप्तिकरातून सूट दिली जाईल.


ही बातमी वाचा: