सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील सुरेश दळवी या शेतकऱ्याने ध्येय, जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आज 15 वर्षांच्या परिश्रमातून 152 एकरवर अननसाची (Pineapple Farmer) किफायतशीर शेती उभी केली आहे. तिलारी खोऱ्यातील पाळ्ये हे गाव त्यांचं गाव. तिलारी धरणाजवळ असल्याने अननसाच्या शेतीला मुबलक पाणी मिळाल्याने पडीक जमिनीवर अननसाची शेती करून वर्षाकाठी 152 एकर क्षेत्रामधून एक कोटी 52 लाख रुपयांचा वार्षिक नफा मिळवला आहे.
2008 साली दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यात केरळ राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाडे तत्वावर जमिनी घेऊन अननस, रबरची शेती करायला सुरुवात केली. काही केरळी शेतकरी सुरेश दळवी यांच्या मित्राच्या मदतीने त्यांच्यापर्यंत पोहोचले. पडीक जमीन भाडे तत्वावर अननस शेती करण्यासाठी मागणी केली. मुळात पडीक जमीन आणि त्यात अननस शेती ही त्यांच्यासाठी नवीन कल्पना होती. म्हणून त्यांनी त्याची माहिती घेण्यासाठी केरळ राज्यात जाऊन अननसाच्या शेतीची प्रत्यक्षात पाहणी केली. तिथे अननसाची शेती पाहिल्यानंतर ती शेती किती फायद्याची किंवा तोट्याची आहे हे ही पाहिलं. त्यानंतर गावाकडे येत सुरुवातीला भागीदारीमध्ये 25 ते 30 एकरावर अननसाची शेती केली.
शेतकरी सुरेश दळवी हे सहा वर्षापासून अर्धांगवायूच्या आजाराशी संघर्ष करत आहेत. पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर सुरेश दळवी यांनी अननसाच्या शेती मध्ये यशस्वी झाले आहेत. सुरेश दळवी हे शेतकरी तिलारी खोऱ्यात गेले पंधरा वर्ष अननसाची लागवड करत आहेत.152 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी अननसाची यशस्वी शेती केली आहे. कोरोना काळात त्यांना मोठा फटका सहन करावा लागला होता.
अननसाची रोप एकदा लावल्यानंतर सलग चार वर्षे उत्पन्न देतात. त्यानंतर एक वर्ष पडीक ठेऊन पुन्हा अननस शेती करतात. त्यासाठी त्यांनी मजूर बाहेरच्या राज्यातील घेतले. झारखंड राज्यातून मजूर आणले. यांच्याकडे सध्या 30 मजूर हे झारखंड राज्यातील आहेत. अननसाला सुरुवातीला दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये मोठी मागणी होती. मात्र सध्या शेजारच्या गोवा राज्यातील आणि बेळगाव, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील व्यापारी जागेवर येऊन अननस घेऊन जातात.
सुरेश दळवी यांनी 152 एकर क्षेत्रामध्ये चार ठिकाणी अननसाची लागवड केली आहे. कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष अननसाला पूर्णपणे फटका बसला, त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान झालं. आता ते सरासरी एक एकरला एक लाख रुपये उत्पन्न मिळवत असून 152 एकर क्षेत्रामधून खर्च वजा करून वर्षाकाठी एक कोटी 52 लाखांचा नफा मिळाला आहे.
अननसाला सरासरी यावर्षी 60 रुपये किलो दर मिळतो. एका एकरात अननसाच्या लागवडीतून सरासरी दोन लाखांचं उत्पन्न होत. त्यातून मजूर, खत व्यवस्थापन, पाणी आणि इतर खर्चासाठी एक लाख रुपये खर्च होऊन एक लाखाचा निव्वळ नफा होतो. एका एकरातून अननसाच्या शेतीतून एक लाख निव्वळ नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.