Sindhudurg News : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात हत्तींचा (Elephant) वाढता उपद्रव रोखण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepal Kesarkar) यांनी थेट नागपूर येथे राज्याचे प्रधान सचिव माहीप शुक्ला आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत हत्तींपासून संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना तसेच वन पर्यटन विकसित करण्याबाबत चर्चा केली. शिवाय शेतकऱ्यांना नुकसानभरपाई (Compensation) तातडीने मिळण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केरळच्या धर्तीवर हत्तींपासून संरक्षणासाठी टोकदार खिळ्यांची संरक्षक भिंत उभारण्याची उपाययोजना करण्यासाठी मास्टर प्लॅन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्ष हत्तीचं वास्तव्य असून शेती आणि बागायतींचं नुकसान करत आहेत. 2002 मध्ये कर्नाटकमधून  दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात आलेले हत्ती गेली 20 वर्ष याच भागात असून शेतीचं आणि बागायतीचं नुकसान करत आहेत.


केर, मोर्ले, हेवाळे, बांबर्डे गावात हत्तींचा धुसगूस


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात (Tillari Valley) सध्या सहा हत्तींचा उपद्रव सुरु आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेले तीन महिने या नुकसानीत कमालीची वाढ झाली आहे. या हत्तींनी केर, मोर्ले, हेवाळे, बांबर्डे येथे मोठ्या प्रमाणात धुडगूस घातला आहे. तिलारी खोऱ्यातील सर्व सरपंचांनी एकत्रित येत वन्य हत्ती बंदोबस्ताची जोरदार मागणी केली आहे. हत्तीबाधित तिलारी खोऱ्यात या हंगामात काजूचं पीक येत आणि काजू गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांना बागायतीमध्ये जावं लागतं. अशावेळी हत्ती काजू बागेत येत असल्याने शेतात आणि बागायतीमध्ये जायचं कसं? असा प्रश्न बळीराजाला सतावतो आहे. 


हत्ती लोकवस्तीपर्यंत आल्याने गावकरी भयभीत, वनविभागाची डोकेदुखी वाढली


दरम्यान तिलारी खोऱ्यात हत्ती आता वस्तीपर्यंत आल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे. हत्तींना रोखण्याच्या मागणीसाठी 1 एप्रिलपासून शेतकरी, ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात गेली 22 वर्ष हत्ती शेतीचं आणि बागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे शेतकऱ्यानी कंटाळून हत्ती हटाओ मोहीम राबवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मोर्ले-केर मार्गावर दिवसा हत्ती रस्त्यावर आल्यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. रानटी हत्ती ज्यामध्ये एक नर हत्ती आणि पिल्लू यांचा समावेश होता. चार दिवसांपूर्वी दोन वेळा हत्ती लोकवस्तीत आला होता. सायंकाळी हत्तीने मार्ग रोखल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यामुळे दोडामार्ग मध्ये हत्ती प्रश्न डोकं वर काढत असून वनविभागाची डोकेदुखी ठरत आहे.


हेही वाचा


Sindhudurg News : तळकोकणातील तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुडगूस; केळी, काजू, नारळ, पोफळीच्या बागांचं मोठं नुकसान