Sindhudurg News : सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीने धुडगूस घातला आहे. शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचं मोठं नुकसान होत आहे. पावसाळ्यात घाटमाथ्यावर गेलेले हत्ती पुन्हा तिलारी खोऱ्यात परतल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी भयभीत झाले आहेत. 2002 मध्ये कर्नाटकमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात आलेले हत्ती गेली 20 वर्ष याच भागात असून शेतीचं आणि बागायतीचं नुकसान करत आहेत.


महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेलं तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्ष हत्तीचं वास्तव्य असून शेती आणि बागायतींचं नुकसान करत आहेत. पावसाळा सुरु झाला की हे हत्ती घाटमाथ्यावर जातात आणि पुन्हा पावसाळा संपल्यानंतर परत येतात. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्षे वावरत आहे. त्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. उन्हाळी शेती, काजू, नारळ, सुपारी केळी या बागायतीचे हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. रात्री हत्ती घाटीवडे परिसरात फिरत असताना ग्रामस्थांना दिसला. त्यामुळे ग्रामस्थांनी टक्कर हत्तीला हाकलून देण्याचा प्रयत्न देखील केला.


नुकसानभरपाई नको पण हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा, तिलारी खोऱ्यातील ग्रामस्थांची मागणी 


मात्र पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा हत्ती तिलारीच्या खोऱ्यात परतल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतकरी शेतीत आणि बागायती जाण्यास सुद्धा घाबरत आहेत. हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई देखील शासनाकडून तूटपुंज्या स्वरुपात मिळत आहे. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई नको तर हत्तींचा कायमचा बंदोबस्तच व्हावा अशी मागणी तिलारीच्या खोऱ्यात होऊ लागली आहे.


हत्तींनी केलेल्या नुकसानीकडे वनविभागचा कानाडोळा तर शासनाचं दुर्लक्ष


दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीने पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. बांबर्डे, हेवाळे, घाटीवडे या भागात रात्री टस्कर हत्तीने बागायतींचं नुकसान केलं आहे. हत्तींच्या नुकसानीकडे वनविभाग कानाडोळा करत असून शासन लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. शेती, बागायतीचं मोठ्या प्रमाणात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यासमोर ठाकला आहे. शासनाकडे हत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी केली. मात्र याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. जी नुकसान भरपाई मिळते ती तुटपुंज मिळते. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई नको तर हत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. टस्कर हत्ती रात्रीचा फिरत असल्यामुळे भीतीदायक वातावरण तिलारीच्या खोऱ्यात असल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी भयभीत आहेत. गावकऱ्यांना घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झाला आहे.