Narayan Rane on Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना स्वतः अडीच वर्ष काही केलं नाही, आणि याला ते द्या, त्याला हे द्या, आम्ही संपाला पाठिंबा देऊ म्हणत आहेत. जनाची ना मनाची लाज बाळगा, सत्ता गेल्याने पायाखालची वाळू सरकली आहे. पद गेलं आणि वेड्यासारखे बडबडू लागल्याची टीका नाव न घेता नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली. दरम्यान, राणे यांनी आपल्या नितेश आणि निलेश राणे यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. निमित्त होतं ते माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे. ते सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये बोलत होते.
वैभव नाईकांवरही तोफ डागली
दरम्यान, निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार वैभव नाईक यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले की, "शिवरायांचं नाव घेऊन राज्य केलं. मात्र, फितुरी करुन आजही इतिहास उजळला जातो. सहकाऱ्यांवर, लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. आता पायाखालची वाळू सरकली, पद गेल आणि वेड्यासारखे बडबडू लागले." वैभव नाईक हे भविष्य सांगणारे असल्याचं म्हणत कानाखाली आवाज काढण्याची भाषा राणेंनी केली. मोदींना राज्यातून 40 पेक्षा जास्त खासदार निवडून देऊ, त्यासाठी काम सुरु केलं असल्याचं राणे म्हणाले.
नारायण राणे दोन महिन्यांत राजीनामा देतील असे वैभव नाईकांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. याला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं. भविष्य सांगणारा म्हणत वैभव नाईकांच्या कानाखाली मारली असती असं वक्तव्य राणेंनी केले. "जसं मला भेटून गेला आणि मी त्याला कानात सांगितलं. कान पुढे केला असता तर कानफटात मारली असती, सांगायची गोष्ट वेगळीच. मी केंद्रीय मंत्री आहे राजीनामा का देईन असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझा पक्ष आज सतेत्त आहे, सत्तेत ठेवायचा आहे. मोदी सरकारमध्ये 42 ते 45 खासदार निवडून पाठवायचे आहेत, या तयारीला आम्ही लागलो आहेत. आता खासदार पण भाजपचा होईल," असं राणे म्हणाले.
निलेश आणि नितेश कार्याबद्दल गर्व
नारायण राणे पुढे म्हणाले की, "निलेश राणे आणि नितेश राणे ही दोन्ही मुलं महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. मला त्यांच्या कार्याबद्दल, कर्तृत्वाबद्दल गर्व आहे." जिल्ह्यातील विरोधकांचा सामाजिक, विधायक, विकासात्मक काय कार्य आहे? असा सवालही त्यांनी केला. भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत एकही जागा विरोधी पक्षाला मिळता कामा नये असे आवाहन राणेंनी जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं. विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद शत प्रतिशत भाजप असण्याचं आवाहनही त्यांनी केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या