सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सावंतवाडी पोलीस स्थानकात पोलीस अधिकारीच (Police Officer) लाच स्विकारताना रायगड लाचलुचपत विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडलं आहे. दीड लाखाची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रूपयांची रक्कम घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याला रंगेहाथ पकडलं होतं. तर दुसरा संशयित पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील हा मंत्री दीपक केसरकर याच्या बंदोबस्तात होता. त्यामुळे रात्री उशिरा बांदा पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलं.


सिद्धांत परब यांच्याकडून लाच स्वीकारल्या प्रकरणी रायगड लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याला ताब्यात घेण्यात आलं. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांच्या मागावर संबंधित पथक होतं. बांदा पोलिसांचं एक पथक गोव्यात दाखल झालं. त्यांनी गोव्यातून सूरज पाटील याला ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री 12.30 च्या सुमारास सावंतवाडीत पोलिसांचं हे पथक दाखल झालं. 


पोलीस अधिकाऱ्यालाच लाच घेताना पकडलं


रायगड लाच लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी स्वतः सावंतवाडी पोलीस स्थानकात येऊन ही धाड टाकली. त्यावेळी कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचं समोर आलं. सावंतवाडी पोलीस  स्थानकात दोन पोलीस अधिकाऱ्यांनी दीड लाखांची लाच मागितली होती. त्यातीलच एक लाख रुपयांची रक्कम घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे याला रंगेहाथ पकडले. तर यातच सामील असलेला दुसरा पोलीस अधिकारी हा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या दौऱ्यात बंदोबस्तासाठी तैनात होता. 


सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील हे मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात संरक्षणार्थ होते. ते रात्री उशिरापर्यंत त्यांच्यासोबत गोव्यात होते. त्यामुळे बांदा पोलिसांचं एक पथक गोव्याला रवाना झाले. त्यानंतर त्यांनी रात्री उशीरा सूरज पाटीलला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान बांदा पोलीस रात्री सावंतवाडीत पोहचण्यापूर्वीच सूरज पाटील याची प्रकृती बदलली. त्यामुळे त्याला कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  लाच लुचपत विभागाकडून  संशयित सागर खंडागळे याची कसून चौकशी करण्यात येत आहे. 


काही पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सहभागी 


दरम्यान यामध्ये काही पोलीस अधिकारी देखील सहभागी असल्याची माहिती रायगड लाच लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी दिली आहे. सावंतवाडी पोलीस स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेला कुठेतरी धक्का लागला असल्याचं आता म्हटलं जात आहे. त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यांवर कोणती कठोर कारवाई करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


हेही वाचा : 


Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश; स्वतः कोर्टात हजर राहाणार?