Sindhudurg Savdav Waterfall : पावसाळ्यात डोंगरदऱ्यातून कोसळणाऱ्या धबधब्यांचं निसर्गरम्य दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली असते. अशातच घाटमाथ्यावरुन कोसळणारे धबधबे हे निर्सगाच्या अद्भुत सौंदर्यची साक्ष देखील देत असतात. त्यातीलच कोकणातील सावडाव धबधबा (Savdav Waterfall) हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. या धबधब्यांखाली चिंब भिजून त्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची बरीच गर्दी होते.


लोणावळा, कोकण (Kokan) या ठिकाणी सध्या पर्यटकांची लगबग सुरु असल्याचं चित्र सध्या आहे. त्यातच कोकणात पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपलं रूप पालटतो. हिरवागार शाल पाघंरून निसर्ग नेहमीचं पर्यटकांना आकर्षित करत असतो.मुंबई-गोवा महामार्गापासून जवळच असलेला सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली मधील सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटक या धबधब्याकडे मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत.


गर्द हिरवी झाडी आणि फेसळणारा धबधबा


पर्यटकांसाठी कोकण हे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिला आहे. कोकणातील अनेक ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. सावडाव धबधबा हा त्यातीलच एक आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. मुंबई - गोवा महामार्गापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा धबधबा आहे. तर कणकवली पासून अवघ्या 16 किमी अंतरावर हा धबधबा आहे. डोंगर पठारावरून पसरट कड्यावरून खाली कोसळणारा हा धबधबा पर्यटकांसाठी एक सुखद अनुभव देणार ठरतो. 


गर्द हिरव्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून कोसळणारा हा धबधबा जवळपास  60 ते 70 फूट रुंदीचे आणि 30 फूट उंचीवर आहे. गर्द वनराईतून वाहत या धबधब्याचं रुपांतर पुढे ओहळात होते. सावडाव धबधबा ठिकाणी प्रवेशद्वारावर ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक पर्यटकाला कर लावला जात आहे. दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी यावर तोडगा म्हणून पार्किंग कर देखील लावला जात आहे. परंतु या कराची किंमत अगदी वाजवी दरामध्ये आहे. 


सावडाव धबधबा ठिकाणी सर्व पर्यटकांनी येताना दरवर्षी प्रमाणे आनंद लुटावा व सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपचायतीतर्फे केले आहे. वर्षा पर्यटनासाठी जिल्ह्यासह राज्य आणि परराज्यातील पर्यटकांची उच्चांकी गर्दी आता सावडाव धबधब्यावर दिसू लागली आहे.


सध्या राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. यामध्ये आंबोलीचा मुख्य धबधबा, बाबा धबधबा, नागरतास धबधबा, सावडाव धबधबा, मांगेली धबधबा, नापणे धबधबा, असनिये धबधबा या धबधब्यांचा समावेश आहे. सावडाव धबधबा हा सुरक्षित असल्यामुळे पर्यटकांची देखील बरीच गर्दी येथे जमते. त्यामुळे निसर्गाच्या या अद्भुत देणगीचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर सावडाव धबधबा हे त्यासाठी उत्तम ठिकाण आहे. 


हे ही वाचा : 


Nanded Sahastrakund Waterfall : नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, Waterfall पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी