Maharashtra Sindhudurga News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurga District) बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून आठवड्यातून केवळ चारच दिवस टेक ऑफ होत आहे, तेही रामभरोसे. चिपी विमानतळावर अलायन्स एअरची विमानसेवा सुरू असून सद्यस्थितीत सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे चारच दिवस विमान ये-जा करतं, उर्वरीत बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तीन दिवस विमान येत नाही. पावसामुळे वातावरण खराब झाल्यास त्या दिवशी विमानसेवा रद्द केली जाते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरील विमानसेवा रामभरोसे सुरू आहे. याचा फटका विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे.


देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हात दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळाकडे महाराष्ट्र शासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. कारण मोठा लवाजवा करत या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. मुळात कोकणातील हवामानाचा अंदाज घेऊन विमानतळावर विमान उतरण्यासाठी आणि उड्डानासाठी कोणत्याही परिस्थितीत लागणाऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात धुक्याचं प्रमाण जास्त असतं. तसेच पावसाळी वातावरण असल्यास विमान उतरण्यास किंवा उड्डाण करण्यास तांत्रिक बाबी समोर येतात. पर्यायानं विमानसेवा रद्द केली जाते. याचा फटका विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच बसतो. त्यामुळे शासनानं जरी खाजगी तत्वावर हे विमानतळ सुरू केलं असलं तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळ्यात तर सिंधुदुर्ग विमानतळावरून प्रवाशांना रामभरोसे विमानसेवेचा अनुभव कायमच येतो. 




सिंधुदुर्गातील बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर अलायन्स एअर कंपनी प्रवाशांना सेवा देते. मात्र सध्या या विमानतळावरून केवळ 4 फ्लाईट टेक ऑफ करत आहेत. रामभरोसे विमानसेवा असल्यानं विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसत आहे.  


सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर 800 कोटी खर्च करून उभारण्यात आलं. चिपी गावात हे विमानतळ उभारून देशातील पहिल्या पर्यटन जिल्ह्याला गती देण्यासाठी उभारण्यात आलं असल्याचा दावा राजकीय नेतेमंडळींकडून करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात या विमानतळाचा पर्यटनाला कोणताही फायदा होताना दिसत नाही. याउलट शेजाऱ्याच्या गोवा राज्यात मात्र देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान येऊन मोठ्या संख्येनं देश विदेशातील पर्यटक येतात. त्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळत आहे.


बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर भविष्यात विमानांची संख्या वाढविली जाईल, माल्टा देशाचं विमान याठिकाणी उतरेल अशा वल्गना माजी पालकमंत्री तथा विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. मात्र विमानांची संख्या सोडाच सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेनं सातही दिवस एक विमान येऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनी तर या विमानतळावरुन सिंधुदुर्ग ते शिर्डी आणि मैसूर विमासेवा सुरू करू, असं म्हटलं होतं, तेही हवेत विरलं. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नियमित विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक उड्डाण मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन मार्ग काढू म्हटलं होतं. मात्र अद्याप नियमित विमानसेवा सुरू झालेली नाही. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील दुसरं विमान याठिकाणी सुरू केलं तेही काही दिवसांत बंद झालं. त्यामुळे बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरील विमानसेवा सध्या तरी रामभरोसे आहे.


ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी तर केंद्र आणि राज्य सरकारनं गोव्यातील मोपा विमानतळ सुरू ठेवण्यासाठी बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचा बळी दिला, अशी टीका केली होती. सुरुवातीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हे विमानतळ उभारून झालं तेव्हा मात्र देशाअंतर्गत विमानसेवा सुरू राहतील अशा प्रकारचीच धावपट्टी उभारण्यात आली आहे.