Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवरून महायुती मित्र पक्षांमध्ये अद्यापही एक मत झालेलं नाही. शिवसेना असो किंवा भाजप, आमचाच उमेदवार असणार असे दावे केले जात आहेत. त्यात आता शिवसेनेने उमेदवार आमचाच असणार असा दावा केल्यामुळे पुन्हा एकदा नव्याने तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यात रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी भाजपने लोकसभा निरीक्षक नेमलेला नाही. यामुळे जागा भाजपला जाणार का शिवसेनेला? ही चर्चा अधिक जोरात सुरु आहे.
रत्नागिरी -सिंधुदुर्ग या लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चित झाली. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली. पण महायुतीचा उमेदवार कोण यावरून अद्यापही दावे प्रतिदावे सुरू आहेत.
किरण सामंत यांची तयारी सुरू
शिवसेनेने जागा लढवावी अशी माझी इच्छा आहे पण निर्णय मुख्यमंत्री घेतील, जिथे-जिथे शिवसेनेचे खासदार आहेत तिथे-तिथे शिवसेनेचा दावा आहे असं विधान राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. मुख्य म्हणजे याच जागेवर उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. त्यांनीदेखील आपली इच्छा आहे हे कधीच लपवले नाही. पण असं असताना भाजप का शिवसेना? जागा कुणाला सोडली जाणार? या प्रश्नाचे उत्तर अद्याप तरी मिळालेलं नाही
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. लोकप्रतिनिधींची तुलना करता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपचा केवळ एकच आमदार नितेश राणे यांच्या रूपाने आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेनेची ताकद दिसून येते.
भाजपने निरीक्षक नेमला नाही
सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेसाठी अद्याप निरीक्षकच नेमलेला नाही. शिवाय निवडणूक चिन्हांमधून धनुष्यबाण चिन्ह निवडणुकीवेळी नसणे म्हणजे महायुतीला एक प्रकारे धोकाच मानला जातोया सर्व गोष्टींचा विचार करता शिवसेना या मतदारसंघावर अधिक सक्रिय आणि आक्रमकपणे दावा करत आहे.
कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेमध्ये अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. कधीकाळी एकमेकांविरोधात कट्टरपणे लढणारे आज एकत्र आहेत. शिवाय ज्यांच्या हाताखाली काम केलं तेच आज राजकारणात पुढे अधिक सक्रियपणे जाताना दिसून येत आहेत. त्यामुळे महायुतीतील नेत्यांची एकमेकांना होणारी मदत हा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरेल.
राज्यात मोठ्या उलटापालटी झाल्या तरी ठाकरे गटाचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षांतर केलेले दिसून येत नाहीत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार केल्यास कोकणातली लोकसभा निवडणूक अधिक रंगतदार, चुरशीची आणि मित्र पक्षांमधील नेत्यांमध्ये असणाऱ्या समन्वयाची कसोटी पाहणारी ठरणार आहे.
ही बातमी वाचा :