Narayan Rane :  रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार (Lok sabha Election) संघावरुन महायुतीमधील तिढा अद्याप कायम असल्याचं दिसतेय. मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज सकाळीच या मतदारसंघावर दावा ठोकला होता. त्याला आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. नारायण राणेंनी  रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपचा दावा असल्याचं म्हटलेय. त्यामुळे महायुतीमधील वाद आता चव्हाट्यावर आलाय. 


नारायण राणे यांनी ट्वीट करत उदय सामंतांचा दावा खोडून काढला. त्यांनी ट्वीट करत  रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा असल्याचं सांगितलेय. नारायण राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, "कसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे."


दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी  रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर महायुतीमध्ये एकमत झाल्याची चर्चा रंगली होती. पण आज दोन्ही पक्षांकडून पुन्हा एकदा दावा सांगण्यात आला आहे.  रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपकडून नारायण राणे तर शिवसेनेकडून उदय सामंत यांचे बंधू इच्छूक आहेत. 






उदय सामंताचां दावा - 


लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू. त्यामुळे आम्ही 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. जागांची चर्चा आमचे तीन नेते मिळून करतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेने लढली आहे. त्यामुळे ती जागा शिवसेनाच लढेल. शिवसेनेने जागा लढवावी, अशी माझी इच्छा आहे. पण निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबियांची ताकद, रत्नागिरी जिल्ह्यात काय?


कधीकाळी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे म्हणजे नारायण राणे यांचा बालेकिल्ला असं समीकरण होते. पण, सध्या मात्र राणेंची राजकीय ताकद पाहता तसं म्हणता येईल का? याबाबत मात्र शंका आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबियांची ताकद असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यात दिसून येत नाही. त्यामुळे महायुतीत इतर लोकप्रतिनिधी त्यांनी किती मदत करतात? यावर सारी गणितं अवलंबुन असणार आहेत. विशेष बाब म्हणजे सामंत बंधुंचा रोल देखील यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे.  करण सामंतांना उमेदवारी नाकारल्यास त्याचा परिणाम राणेंच्या मतदानावर होईल का? हा फॅक्टर लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.