सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवलीमधील ओसरगाव येथे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने 1 जूनपासून टोल वसुली करण्याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती. मात्र महामार्गाचे अपूर्ण असलेले काम आणि सिंधुदुर्ग पासिंग वाहनांना टोल माफीतून सूट देण्याची मागणी या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा आणि जनतेचा टोल वसुलीला असलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन आजपासून काढण्यात आलेला टोलवसुलीचा मुहूर्त तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे टोल वसुली तूर्तास तरी टळली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर संबंधित सर्वांची एकत्रित बैठक घेऊन त्यानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव आणि राजापूर हातवली येथीलही टोलनाका सध्या बंद असून सिंधुदुर्गातील सर्वच राजकीय पक्षांनी या टोलवसुलीला तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला. शिवसेनेतर्फे आज ओसरगाव टोलनाका येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे. आमदार वैभव नाईक यांनीही टोलवसुली सुरु कराल तर शिवसेनेशी गाठ आहे, असा इशारा दिला आहे. तर भाजपच्या वतीने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन टोलवसुली सुरु करण्यास तीव्र विरोध दर्शवत महामार्गाचे सर्व काम पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी मिळत नाही तोपर्यंत टोल वसुली करु नये. अन्यथा त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा दिला होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी येत्या चार दिवसांत महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनी, टोल कंपनी या सर्वांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल त्यामुळे भाजपने आंदोलन स्थगित केलं आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या 60 किमी लांबी करता एम डी करीमुन्नीसा या टोल ठेकेदार कंपनीमार्फत आजपासून टोलवसुली सुरु करण्यात येणार होती. कोणत्या वाहनांना किती टोल हे देखील निश्चित करण्यात आलं होतं. त्यानुसार ओसरगाव नाक्यापासून 20 किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक 315 रुपयांचा पास देण्यात येणार होता. तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागेल. दुचाकी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट देण्यात आली. दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार होती.


संबंधित बातम्या