Chipi Airport Landing : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर गेल्या तीन दिवसांपासून खराब हवामानामुळं विमान लँडिंग रद्द करण्यात आलं आहे. विमान लँडिंग करण्यास पायलटला अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळं गेले तीन दिवस विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. त्याआधी गेल्या पंधरा दिवसांत दोन वेळा खराब हवामानामुळं विमान सेवा रद्द करण्यात आली होती. आता तर सलग तीन दिवस खराब हवामानामुळे विमान रद्द करण्याची वेळ अलायन्स एअर कंपनीवर आली आहे. त्यामुळे या पावसाळी वातावरणात सिंधुदुर्ग विमानतळावरील विमानसेवा राम भरोसे असल्याचं बोललं जात आहे.
प्रवाशांचे हाल
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुंबईकडे विमानाने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. चिपीच्या माळरानावर 9 ऑक्टोबरला अलायन्स एअर कंपनीचे 72 आसनी प्रवासी विमान सेवा सुरु झाली होती. या विमानसेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. विमानसेवा सुरु झाल्यापासून खराब वातावरणाचा फटका विमान सेवा देणाऱ्या कंपनीला आणि प्रवाशांना वारंवार बसत आहे.
चिपी विमानतळाबद्दल
274 हेक्टर जागेवर हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विमानतळाची धावपट्टी 60 मीटर रुंद आणि 2.5 किलोमीटर लांबीची आहे. सध्या या ठिकाणी तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता 15 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी नाईट लॅंडिगचीही व्यवस्था आहे. विमानात इंधन भरण्याचीही सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.
10 हजार चौरस मीटरचे टर्मिनल काम असून सुमारे 180 प्रवासी क्षमतेची विमानं या ठिकाणी उतरु शकतात. कुडाळ, कसाल आणि सातार्डा अशा तीन ठिकाणी या विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. हवाईमार्गे येणारे पर्यटक हे गोवा राज्याकडे जात होते. पण चिपीचं विमानतळ सुरु झाल्यामुळं दिल्लीसारख्या महानगरातून जिल्ह्यात पर्यटकांना येणं सोपं झालं आहे. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी देखील फायदा होणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजू आणि मासळीचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. सध्या देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सिंधुदुर्गच्या देवगड हापूस आंब्यानं मोठं नाव कमावलं आहे.