(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivaji Maharaj Statue: सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा ठाण्यातील जयदीप आपटे नेमका कोण?
Sindhudurg Shivaji Maharaj: छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे कोण? अवघ्या दीड-दोन फुटांची मुर्ती साकारण्याचा अनुभव असलेल्या ठाण्यातील तरुणाला थेट 28 फुटांचा पुतळा उभारण्याचं कंत्राट मिळालं का?
ठाणे: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जात आहे. भारतीय नौदलाने शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची उभारणी करुन घेतली होती. हा पुतळा उभारण्याचे कंत्राट ठाण्यातील जयदीप आपटे या 25 वर्षांच्या तरुणाला देण्यात आले होते. हा पुतळा उभारण्यापूर्वी जयदीप आपटे याला फक्त दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव होता. त्याने स्वत:च एका मुलाखतीत अशी माहिती दिली होती. त्यामुळे इतका कमी अनुभव असलेल्या तरुण शिल्पकाराला शिवरायांचा इतका मोठा पुतळा उभारण्याचे कंत्राट का देण्यात आले, असा सवाल आता निर्माण झाला आहे.
याप्रकणी पोलिसांनी जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील (Chetan Patil) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. मी फक्त या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीने काम केलं होते, असे चेतन पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करणारा ठाण्यातील जयदीप आपटे (Jaydeep Apte) हा तरुण कोण, याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.
कोण आहे जयदीप आपटे?
जयदीप आपटे हा कल्याणमधील अवघ्या 25 वर्षांचा तरुण आहे. जयदीप आपटे यानेच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 28 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारला होता. 28 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा बनविण्यास साधारण 3 वर्षांचा काळ लागतो. पण हा पुतळा जून 2023 मध्ये बनविण्यास सुरुवात केली आणि तो डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजे अवघ्या सात महिन्यांमध्ये पूर्ण झाला, अशी माहिती जयदीप आपटे याने सनातन प्रभात या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली होती.
'जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल...' जयदीप आपटे असं का म्हणाला होता?
जयदीप आपटे याची 'सनातन प्रभात' दैनिकातील मुलाखत पाहता त्यालाही शिवाजी महाराजांचा इतका मोठा पुतळा आपण उभारू शकतो की नाही, याबाबत साशंकता असल्याचे दिसत आहे. त्याने या मुलाखतीत म्हटले होते की, या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला. संधी मोटी आहे, सगळं व्यवस्थित पार पडले तर सगळीकडे नाव होईल, पण जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल, असे वाटले.. पण म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे.. संधी हातातून सोडायची नाही.'
'कदाचित हे काम होणार होते म्हणूनच की काय, या कामाच्या आधी 3 - 4 शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती. ती अगदी दीड दोन फुटांची होती; पण ती करताना अभ्यास होत होता. जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली ती 'एखादा पुतळा तयार करणार का?', अशी. भारतीय नौदल काम करून घेणार.'
'त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार; म्हणून मग मीच ठरवले की, काम करायचे. एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे ३ लहान नमुने (मॉडेल) बनवले. त्यातील २ नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच शिल्प निवडले गेले, असे जयदीप आपटेने मुलाखतीत सांगितले होते.
आणखी वाचा