Sher Shivray Movie : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं सह्याद्री वाहिनीवर  छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जीवनावर आधारित प्रेरणादायक चित्रपटाची मालिका  सुरु आहे. सह्याद्री वाहिनीवर फत्तेशिकस्त या चित्रपटाचे प्रसारण करण्यात आले होते. त्यानंतर आता दिग्दर्शक दिगपाल लांजेकर (Digpal Lanjekar) लिखित आणि दिग्दर्शित `शेर शिवराज' (Sher Shivray Movie) या चित्रपटाचे उद्या म्हणजेच 2 मार्च रोजी प्रसारण करण्यता येणार आहे. दुपारी दीड वाजता हा चित्रपट प्रसारित होईल. 


 शेर शिवराज चित्रपट राज्यातील रसिकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाचा हा उपक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्तानं राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम सुरु आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि प्रेरणा नव्या पिढीला मिळते. 


सह्याद्री वाहिनीवर चित्रपटांची मालिका


दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपतींच्या जीवनावर आधारित आठ सिनेमांची घोषणा केली आहे. त्यातील फर्जंद, फत्तेशिकस्त, शेर शिवराज, पावनखिंड, सुभेदार आणि शिवरायांचा छावा हे चित्रपट नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हे चित्रपट आता सह्याद्री वाहिनीवर देखील प्रसारित केले जाणार आहेत. शिवरायांची प्रेरणा रसिकप्रेक्षकांना मिळावी, यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित निवडक प्रेरणादायक चित्रपट दाखविण्याचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.


'शिवरायांचा छावा'ने गाजवलं बॉक्स ऑफिस


काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकरांचा शिवरायांचा छावा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीस देखील गाजवलं. हे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 5.12 कोटींची कमाई केली. त्यानंतर आलेल्या शिवजयंतीलादेखील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. 


छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या  या महान योद्धयाची  संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. आलेल्या संकटांवर पाय रोऊन उभे राहत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात घडत आहे.


ही बातमी वाचा : 


मराठीत सिनेसृष्टीत नेपोटीझम असला तरीही चुकीचं नाही, नेपोटीझमच्या मुद्द्यावर सुनील तावडेंच्या लेकांनं स्पष्टच म्हटलं