Shubhankar Tawde on Nepotism : बॉलीवूडमध्ये नेपोटीझम हा मुद्दा फार चर्चेत असतो. तसेच आता मराठी सिनेसृष्टीतही नेपोटीझम आहे का अशाही चर्चा अनेकदा होतात. यावर अभिनेते सुनील तावडे (Sunil Tawde) यांचा मुलगा शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) याने त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. मराठी सिनेसृष्टीत नेपोटीझम नाहीये आणि तो असला तरीही त्यात काही चुकीचं नाहीये, असं शुभंकर म्हणाला आहे. सध्या शुभंकर हा त्याच्या आगामी कन्नी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शुभंकरचा कन्नी हा सिनेमा येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शुभंकरने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावर नेपोटीझमच्या मुद्द्यावर बोलताना शुभंकरनं नेपोटीझमच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. तसेच त्याने यावेळी या मुद्द्यावरचं त्याचं स्पष्ट मतंही व्यक्त केलंय. ही खूप कॉमेडी गोष्ट आहे, आता मलाही माझ्या वडिलांना कामासाठी फोन करावे लागतात. आमचं क्षेत्र हे थेट लोकांसमोर येतं त्यामुळे त्यावर तुम्ही डायरेक्ट बोट ठेवू शकता, असंही शुभंकर यावेळी म्हणाला आहे.
इतर लोकांना असं वाटतं.... - शुभंकर तावडे
नेपोटीझमच्या प्रश्नावर भाष्य करताना शुभंकर म्हणाला की, मला नाही वाटत की मराठी सिनेसृष्टीत नेपोटीझम आहे. कारण अनेकदा माझ्या वडिलांनाही आता कामासाठी फोन करावे लागतात. ही खूप कॉमेडी गोष्ट आहे की, लोकांना असं वाटतं की इथे नेपोटीझम आहे. उद्या समजा मी निर्माता झालो तर हृताच्या मुलीला किंवा मुलाला मी नक्कीच संधी देईन. कारण हृता माझी खूप चांगली मैत्रीण आहे किंवा हृताही असं करु शकेल. आमचं क्षेत्र हे जास्त लोकांसमोर येतं म्हणून हे खूप दिसंत. पण तुम्ही डॉक्टर्स घ्या, स्टॉक मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या फॅमिली असो किंवा किराणा माल सांभाळणारे दुकानदार असो, ही माणसं त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्याच गोष्टी करायला सांगतात. फक्त क्रिकेट, स्पोर्ट्स ही क्षेत्रं लोकांच्या ठळकपणे समोर दिसतात, त्यामुळे तुम्ही यावर थेट बोट ठेवू शकता.
मराठी म्हणजे घराणेशाही असं काही नसतं
पुढे बोलताना शुभंकरने म्हटलं की, समजा की तुमचे काही नातेवाईक मीडिया हाऊसमध्ये काम करत असतील, तर त्यांना कोणीही विरोध करणार नाही. मला मराठी म्हणजे घराणेशाही आणि या सगळ्या गोष्टी आहेत, असं काही वाटत नाही. आम्ही केलेल्या सगळ्याचं गोष्टी लोकांसमोर येतात, त्यामुळे मला नाही वाटत की मराठीत नेपोटीझम आहे आणि असला तरी तो काही चुकीचा नाही आणि फक्त मराठीतच नाही, तर तो कुठेही असला तरी चुकीचाच आहे. लोकं ठरवतात अनेकजण स्वतःला इंडस्ट्रीत लॉन्च केलंय पण त्यांचं काम नाही चांगलं झालं, जे नंतर बाहेरही गेले. त्यामुळे लोकं ठरवतात.