लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी विरोधकांविरोधात तपास यंत्रणांचा वापर, प्रताप सरनाईकांवरील कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया
लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेत काम करत आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
मुंबई : शिवेसनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. ईडीच्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. लोकांच्या प्रश्नाची उत्तरे देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. राज्यात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, हे योग्य नाही. आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे समजल्यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेत काम करत आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
रावसाहेब दानवेंना राजकारणात कधीही ज्योतिषी म्हणून ओळख मिळाली नाही
राज्यात तीन महिन्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा रावसाहेब दानेव यांच्या वक्तव्याचाही शरद पवारांनी समाचार घेतला. रावसाहेब दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे माहिती नव्हतं. रावसाहेब दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहे. पण त्यांचा हा गुण मला माहित नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ज्योतिषी म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळालं, असा टोला शरद पवारांनी लगावला.
Majha Vishesh | सरनाईकांच्या दारात ईडी कारवाई की राजकारण? हा राजकीय इशारा? माझा विशेष